कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटक
Kolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Kolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सीबीआयने सोमवारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली आहे. तपास यंत्रणांनी सलग 15 दिवसांची चौकशीनंतर संस्थेत भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांखाली संदीप घोष यांना ताब्यात घेतलं आहे. सीबीआयने संदीप घोष यांच्याबरोबरच बिप्लव सिंह, सुमन हाजरा आणि अफसर अली यांनादेखील अटक केली आहे.
आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी उपाधीक्षक डॉ अख्तर अली यांनी संदीप घोष संस्थेत कार्यरत असताना अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार दाखल केली होती. यात रुग्णालयातून बेवारस मृतदेहाची तस्करी, बायो मेडिकल कचऱ्याची विल्हेवाट करण्यात भ्रष्टाचार यासारखे अनेक आरोप त्यांच्यावर केले होते. या आरोपानंतर कोलकाता पोलिस तपास करत होती. मात्र, नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.
19 ऑगस्ट रोजी संदीप घोषविरोधात कोलकाता पोलिसांनी आयपीसी कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचाराअंतर्गंत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर 24 ऑगस्टला सीबीआयने हे प्रकरण स्वतःकडे घेतलं. त्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यानंतर संदीप घोष यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात तारा ट्रेडर्स, मध्य झोरेहाट,बानीपुर, हावडा, ईशान कॅफे,4/1, बेलगछिया आणि खामा लौहाहेदेखील आरोपी आहेत.
आरजी करचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सीबीआयने तब्बल 150 तासांहून अधिक वेळ चौकशी करत होती. 9 ऑगस्ट रोजी कॉलेजच्या ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्कार व हत्या प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती. सीबीआयने या संदर्भात संदीपची दोनवेळा पॉलीग्राफ टेस्टदेखील केली होती. पहिल्यांदा चाचणी करण्यात आली तेव्हा संदीपने सीबीआयला समाधानकारक उत्तरं दिली नव्हती.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संदीप घोष यांच्या घर आणि रुग्णालयात जाऊन छापेमारी केली होती. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांसाठी तीन पथके बनवण्यात आली होती. पहिल्या पथकात आरजी कर रुग्णालयातील शवाघरात तपासणी करण्यात आली. पाच सदस्यांच्या पथकाने कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती.