कोलकाता: शारदा चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) झालेल्या चौकशीनंतर कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची बदली करण्यात आली आहे. राजीव कुमार यांना गुन्हे अन्वेषण शाखेत (सीआयडी) पाठवण्यात आले आहे. यानंतर अनुज शर्मा हे कोलकाता शहराचे नवे पोलीस आयुक्त असतील. सूत्रांच्या माहितीनुसार, राजीव कुमार यांच्याकडे सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी शारदा चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयचे एक पथक कोलकाता येथे राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी आले होते. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चौकशीला तीव्र विरोध दर्शविला. यादरम्यान स्थानिक पोलिसांनी सीबीआयच्याच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. या कारवाईविरुद्ध ममता बॅनर्जी यांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले होते. त्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटला होता. 


ममतांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची शौर्यपदके केंद्र सरकार काढून घेणार?


राजीव कुमार यांनी शारदा चिट फंड घोटाळ्यातील अनेक पुरावे नष्ट केल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे सीबीआयला राजीव कुमार यांची चौकशी करायची होती. मात्र, स्थानिक पोलिसांनीच चौकशीसाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिलाँग येथील कार्यालयात राजीव कुमार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांना अटक करू नये, असेही न्यायालयाने म्हटले होते. यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. 


सीबीआय विरुद्ध पोलीस आणि ममता बॅनर्जी यांचं 'राज'कारण