Kolkata Rape And Muder Case: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान सोमवारी (9 सप्टेंबर रोजी) सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका वकिलाला आवाज कमी करा असं सांगत दम भरला. तुम्ही न्यायाधीशांबरोबर बोलत आहात की कोर्टाबाहेरील गॅलरीमधून हाका मारत आहात, असा सवाल करत सरन्यायाधीशांचा पार चढल्याचं पाहायला मिळालं. कोलकाता बलात्कार प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिदस्यीय खंडपीठासमोर सुरु आहे. या खंडपीठामध्ये न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांचा समावेश आहे. याच सुनावणीदरम्यान हा सारा प्रकार घडला.


त्या वकिलाचं भाजपा कनेक्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील कपील सिब्बल यांनी वकील आंदोलकांवर दगडफेक करत होते हे दाखवणारे व्हिडीओ आणि फोटो असल्याचा दावा केला. तसेच दगडफेक करणारी ही व्यक्ती कौस्तुव बागची असल्याचं सांगण्यात आलं. कौस्तुव हे भाजपाचे नेतेही आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये भाजपामध्ये गेले आहेत. कपील सिब्बल यांचा युक्तीवाद ऐकून कौस्तुव यांनी एखादा वरिष्ठ वकील अशाप्रकारची विधान न्यायालयात कशी करु शकतो? असं म्हणत आक्षेप घेतला. 


सरन्यायाधिशांनी सुनावलं


कौस्तुव यांचं हे वाक्य ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, "तुम्ही कोर्टाच्या बाहेर असलेल्या गॅलरीमधील व्यक्तींशी बोलत आहात का? मी मागील दोन तासापासून तुमचा बेशिस्तपणा पाहतोय," असं म्हणत हटकलं. "सर्वात आधी तुम्ही तुमचा आवाज कमी कराल का? सरन्यायाधीशांचं ऐकून तुमचा आवाज कमी करा. तुम्ही केवळ तीन न्यायाधीशांशी संवाद सादत आहात. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन न्यायालयातील घडामोडी पाहाणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही संबोधित करत नाही," अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीशांनी कौस्तुव यांनी समज दिली. त्यानंतर कौस्तुव यांनी खंडपीठाची माफी मागितली.


सत्ताधारी पक्षाने साधला निशाणा


"मात्र आरडाओरड करणाऱ्या आणि अर्धा वेळ वकिली करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? ते पूर्णवेळ भाजपा कार्यकर्ते आहेत. त्यांना वाटतं की कोर्टामध्येही त्यांचं राज्य असलेल्या इतर भागाप्रमाणे बुल्डोझरगिरी चालेल. आजच्या गैरवर्तवणुकीसंदर्भात सरन्यायाधीशांनी त्यांची योग्य ती कान उघाडणी केली," असं तृणमूलने म्हटलं आहे.



दरम्यान या प्रकरणातील पुढील सुनावणी आता पुढील आठवड्यामध्ये होणार आहे.