Kolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?
Kolkata Rape And Murder Case: सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे.
Kolkata Rape And Murder Case: कोलकात्यामधील आर. जी. कर. मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये 9 ऑगस्टच्या रात्री झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतलेल्या सु-मोटो याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला पुढील सुनावणीपर्यंत नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी या प्रकरणामध्ये पीडितेच्या मृतदेह कशा अवस्थेत आढळून आला हे सांगतानाच मृतदेहाजवळून तपासणीसाठी नमुने कोणी गोळा केले हे महत्त्वाचं असल्याचं न्यायालयाला सांगितलं.
मृतदेह कोणत्या अवस्थेत सापडला?
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील मंगळवारपर्यंत हा अहवाल मागवला आहे. दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणेनं या प्रकरणामध्ये घटनास्थलावरील नमुने कोणी गोळा केले हा संशोधनाचा विषय असल्याचं म्हटलं आहे. सॉलिसीटर जनरल मेहता यांनी केंद्रीय यंत्रणाने हे नमुने ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्लीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. "आमच्याकडे फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आहे. त्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख आहे की ज्यावेळी ही तरुणी सकाळी 9.30 वाजता सापडली तेव्हा तिची जिन्स आणि अंतर्वस्र तिच्या शरीरावर नव्हती. तिची कपडे तिच्या देहाच्या बाजूला पडलेली होती. तिचा देह अर्धनग्नावस्थेत होता. तिच्या शरीरावर जखमांचे व्रण होते. अशा परिस्थितीमध्ये नमुने गोळा करण्यात आले आणि ते पश्चिम बंगालमधील सीएफएसएलच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, आता सीबीआयने हे नमुने एम्समध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे," असं सॉलिसीटर जनरल मेहता यांनी सांगितलं.
..म्हणून नमुने कोणी गोळा केले हे महत्त्वाचं
सर्व तपशील सविस्तरपणे न सांगता, सॉलीसीटर जनरल मेहता यांनी, "एक व्यक्ती प्रवेश करते, तरुणी नग्नावस्थेत होती, तिच्या शरीरावर जखमा होत्या आणि हे सारं फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबेरेट्रीच्या अहवालामुळे असेल तर नमुने कोणी घेतले हे महत्त्वाचं आहे," असं म्हणत आपला मुद्दा मांडला. म्हणजेच या पीडितेचा मृतदेह आधी कोणी पाहिला आणि त्या मृतदेहासंदर्भातील वैद्यकीय तपासणीचे नमुने कोणी कलेक्ट केले हे फार महत्त्वाचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. "यावरुन एफआयआर दाखल करण्यात 14 तासांचा उशीर झाला आहे हे स्पष्ट आहे," असं सरन्यायाधीश म्हणाले. कोर्टाने सीबीआयला नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तपास कुठपर्यंत आला हे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नक्की पाहा >> Video: 'आवाज खाली करा, तुमचा बेशिस्तपणा...' सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश 'त्या' वकिलावर चिडले
पुढील सुनावणी कधी?
सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरणाची सुनावणी सुरु असताना एक क्षण असा आला की ज्यावेळी वेगवेगळे वकील वेगवेगळे मुद्दे मांडू लागले. त्यावेळी सरन्यायाधीशांनी, "एकाच वेळी अशाप्रकारे 7 ते 8 जण युक्तीवाद करत खटला चालवण्याची मला सवय नाही," असं म्हणत नाराजी व्यक्त केली. पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी असेल असं सांगण्यात आलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठामध्ये न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांचा समावेश आहे.