Kolkata RG Kar Rape And Murder Case: कोलकात्यामधील विशेष कोर्टाने बुधवारी शहरातील आर. जी. कर मेडिकल कॉलेजचे माजी मुख्यध्यापक डॉ. संदीप घोष यांच्याबरोबरच निलंबित पोलीस अधिकारी अभिजित मोंडल यांना जामीन नाकारला आहे. 9 ऑगस्ट रोजी आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात हे दोघे अटकेत आहेत. कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींविरुद्धचे आरोप हे 'दुर्मिळात दुर्मिळ' म्हणून ग्राह्य धरता येतील असं मत नोंदवलं असून या प्रकरणामध्ये त्यांना 'मृत्यूदंडाची' शिक्षाही होऊ शकते, असं म्हटलंय.


जामीन फेटाळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ज्या पद्धतीचं गुन्ह्याचं स्वरुप आहे आणि जे आरोप करण्यात आले आहेत ते पाहता हे आरोप सिद्ध झाले तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. अशी शिक्षा दुर्मिळात दुर्मिळ प्रकरणामध्ये दिली जाते. हे कोर्ट या मताचं आहे की या आरोपींना जामीन देणं हे न्याय केल्यासारखं होणार नाही," असं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे.


त्या दोन्ही मागण्या फेटाळल्या


"या प्रकरणातील आरोपींचा समाजिक स्तर पाहिल्यास त्यांच्यापैकी एकजण हा डॉक्टर असून दुसरा पोलीस अधिकारी आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही," असंही कोर्टाने म्हटलं आहे. "मात्र सामाजिक स्तरावरील त्यांचं वजन लक्षात घेतलं नाही तर प्रकरणाचं गांभीर्य टाळता येणार नाही," असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच कोर्टाने इन कॅमेरा सुनावणी घेण्याची याचिकाही फेटाळली आहे. तसेच आपल्या इच्छेनुसारच नार्को टेस्ट केली जावी ही याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे.


खोटे अहवाल तयार करण्यात आल्याची शक्यता


केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने म्हणजेच सीबीआयने या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये खोटे अहवाल तयार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच काही नोंदीबरोबर छेडछाड करण्यात आल्याचंही सीबीआयने म्हटलं आहे. या शंका असलेल्या गोष्टींची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सीबीआयने कोर्टाला सांगितलं.


पुरावा म्हणून सीटीटीव्हीचे फुटेज केले सादर


"संदीप घोष आणि पोलीस स्टेशनमधील प्रमुख अधिकारी (अभिजित मोंडल) यांचा या प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता आहे," असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजही मोंडलचा सहभाग असल्याचा पुरावा म्हणून अतिरिक्त पुरावे स्वरुपात कोर्टासमोर सादर करण्यात आले आहेत. मोंडल आणि घोष यांची कोठडीमध्ये चौकशी करण्यासाठी कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयने केली. कोर्टाने 30 सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढवून दिली आहे. 


मुख्य आरोपीला दुसऱ्याच दिवशी अटक


मोंडलला 14 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तर यापूर्वीच घोषला भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने या प्रकरणात 15 सप्टेंबरपासून घोषला कोठडी सुनावली. सीबीआयने प्रमुख आरोपी असलेल्या संजय रॉयला 10 ऑगस्टला अटक केली. कॉलेजच्या आवारातील सेमीनार हॉलमध्ये पीडितेचा मृतदेह सापडल्याच्या दुसऱ्याच दिवशीच आरोपीला अटक करण्यात आली.