कोझीकोड विमान अपघातात मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा मृत्यू
केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे.
कोझीकोड : केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायूदलात विंग कमांडर असलेले कॅप्टन दीपक साठे यांनी १९८१ ते २००३ या कालावधीमध्ये देशसेवा केली. वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर दीपक साठे २००३ साली एयर इंडियामध्ये रुजू झाले. दीपक साठे हे मुंबईच्या पवईतील जलवायू विहार येथे राहत होते.
कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एयर इंडियाचं A737 बोईंग हे विमान रनवेवर घसरलं आणि दरीमध्ये गेलं.
आज संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास लॅण्डिंगच्यावेळी करीपूर विमानतळावर ही दुर्घटना झाली आहे. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे विमान रनवेवर लॅण्डिंग केल्यावर दरीमध्ये कोसळलं, त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. एनडीआरएफची टीम करीपूर विमानतळावर दाखल झाली आहे.
या विमानामध्ये १७४ प्रवासी, १० लहान मुलं, २ पायलट आणि ५ केबिन क्रू एवढे जण होते. या विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. विमानतळावर सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि प्रवाशांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात येत आहे.