`नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग`
कुमार केतकर यांचा सनसनाटी आरोप
पुणे : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसणं हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा हिस्सा असल्याचा सनसनाटी आरोप पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतना काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलाय. २०१९ मधील निवडणुकीत मोदींचा पराभव झाला, तरी सुद्धा सत्ता हस्तांतरण सामन्यपद्धतीनं होणार नाही असंही केतकरांचं म्हणणं आहे. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना केतकरांनी ही विधानं केली आहेत. येत्या निवडणूकीत मोदींचा पराभव झालाच तर मात्र त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारनाम्यांचे पुरावे बाहेर येतील अशी भीती असल्यानं सध्या सीबीआयसह सगळ्या संस्था मोदी आणि शाहांनी ताब्यात घेण्याचा सपाटा लावल्याचंही केतकरांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हटलंय कुमार केतकरांनी?
येत्या निवडणुकांत मोदींचा पराभव झाला तरी मोदी सहजासहजी सत्ता हस्तांतरीत करतील, अशी शक्यता आपल्याला वाटत नाही, असंही यावेळी कुमार केतकर यांनी म्हटलंय.
नरेंद्र मोदींचा सत्तेत प्रवेश हाच मुळात एका व्यापक कटाचा भाग आहे. गोव्याच्या भाजपच्या अधिवेशनात पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव पुढे आलं... परंतु, याच अधिवेशना दरम्यान, त्यांच्याच पक्षातील सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी, यशवंत सिन्हा यांचा मोदींच्या नावाला विरोध होता. म्हणून या अधिवेशनाला लालकृष्ण आडवाणी हजरही राहिले नाहीत. सुषमा स्वराज, शत्रुघ्न सिन्हा लवकर निघून गेले. मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवणं हा या कटाचा पहिला अंक होता.
'पक्षांतर्गत दबावाला बळी'
या अधिवेशनाच्या अगोदर काही दिवस अगोदर नितीन गडकरी पुन्हा अध्यक्ष होणार, हे पक्कं होतं... तसा ठरावही झाला होता... परंतु, अवघ्या काही तासांत राजनाथ सिंग यांच्याकडे हे पद गेलं... यानंतर राजनाथ सिंग अध्यक्षपदी असताना नरेंद्र मोदींची निवड पंतप्रधान पदासाठी कशी झाली असा प्रश्न काही पत्रकारांनी राजनाथ सिंग यांना विचारला. यावर, 'या अधिवेशनात मोदींची निवड पंतप्रधान पदासाठी झाली नसती तर तिथेच मोठ्या प्रमाणात दंगल झाली असती... आम्ही धड काहीच चालू देणार नाही, अशा धमक्या आम्हाला पक्षातूनच आल्या होत्या. अप्रत्यक्षरित्या आपण त्या दबावाला बळी पडून नरेंद्र मोदींचं नाव आपण पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं...' असं राजनाथ सिंग यांनी म्हटल्याचा गौप्यस्फोटही कुमार केतकर यांनी केलाय.
मोदींचा राफेल भ्रष्टाचारात थेट सहभाग
मुख्य गुप्तचर संस्था-सीबीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सर्वोच्च न्यायालयासमोर, राफेल भ्रष्टाचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप केलाय.
हरेन पांड्या ते जस्टिस लोया हत्यांचा कट
इतकंच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच भाजपचे नेते आणि २००२ सालचे गुजरातचे गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येचा कट रचला आणि तो पूर्णत्वास नेला. हरेन पांड्या यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचीही पुढे हत्या करण्यात आली. हा खटला ज्या न्यायाधिशांसमोर उभा राहिला त्या न्यायाधिशांच्या बदल्या केल्या गेल्या... न्यायाधिश लोया हे त्या दबावाला बळी पडले नाहीत तेव्हा त्यांची नागपूरमध्ये हत्या घडवून आणण्यात आली... या घटनांचे पुरावे बाहेर आले तर मोदी आणि शहा यांना जन्मठेपही अपुरी पडेल, असंही कुमार केतकर यांनी एका जाहीर भाषणात म्हटलंय.
दरम्यान, वाढत्या वयाची लक्षणं केतकरांच्या वक्तव्यातून दिसून येतायत... ते काल्पनिक जगात वावरत असल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी झी २४ तासशी बोलताना दिलीयत. केतकर यांच्या या वक्तव्यात कुठल्याही प्रकारची सत्यता नाही आणि त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रीय स्तरावर कुठेही काहीही परिणाम होणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय.