महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस
MP News: नितीन जैन असे या मजुराचे नाव असून गेल्या ५ दिवसांपासून त्याला झोप येत नाही. आता काम सोडून तो इन्कम टॅक्स ऑफिस ते सीए आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. या प्रकाराची आयकर नोटीस केवळ नितीनलाच मिळाली नाही. तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात अशी 44 गरीब कुटुंबे आहेत.
MP News: 'साहेब...! मी एक मजूर आहे. दुकानात काम करून महिन्याला 5,000 रुपये कमावतो. मला पैसे कमी मिळतात, पण मी रात्री आरामात झोपतो. गेल्या काही दिवसांपासून मला रात्रभर झोप येत नाहीये. याचे कारण मला आयकर विभागाने मला 1.25 कोटी रुपयांची डिमांड नोटीस पाठवली आहे. तुमच्या खात्यात लाखो कोटींचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे.' हे पत्र आहे एका मजुराचे. दरमहा जेमतेम 5 हजार रुपये कमावणाऱ्या मजुराला आयकर विभागाने तब्बल सव्वा कोटींची नोटीस पाठवली आहे. यानंतर मजुराची झोप उडाली आहे. काय करावे? कोणाला सांगावे? हे त्याला कळत नव्हते. सर्वकाही समजण्याच्या पलीकडे गेले होते.
नोटीस मिळाल्यानंतर माझ्या घरात भीतीचे वातावरण आहे.मला नोटीस का पाठवली? फक्त हाच विचार येतो, असे तो मजूर सांगतो.त्यानंतर गोंधळलेल्या स्थितीतच आपण आयकर विभाग गाठला आणि अधिकाऱ्यांशी बोललो, असे तो सांगतो.
नितीन जैन असे या मजुराचे नाव असून गेल्या ५ दिवसांपासून त्याला झोप येत नाही. आता काम सोडून तो इन्कम टॅक्स ऑफिस ते सीए आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. या प्रकाराची आयकर नोटीस केवळ नितीनलाच मिळाली नाही. तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात अशी 44 गरीब कुटुंबे आहेत.मागितलेली रक्कम देय तारखेपर्यंत जमा करावी लागेल, असे त्यात लिहिले आहे. आयकर विभागाने या लोकांना एक कोटी ते 10 कोटीपर्यंतच्या डिमांड नोटीस पाठवल्या आहेत. आतापर्यंत, आयकर विभाग पॅनकार्ड धारकांना त्यांचे उत्पन्न आणि त्यांच्या खात्यातील व्यवहार, अघोषित मालमत्ता यासंबंधीच्या तक्रारींवर ई-मेलद्वारे डिमांड नोटीस पाठवत आहे.
नोटीस मिळाल्यानंतर नितीन जैनने स्वत: या गोष्टीचा तपास केला. तामिळनाडूमध्ये त्याच्या नावाने बँक खाते चालवले जात असून त्यात लाखो कोटींचे व्यवहार झाल्याचे त्याला समजले. या व्यवहारामुळेच नोटीस मिळाली असल्याचे समोर आले. याबाबत माहिती मिळताच नितीनने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची लेखी तक्रार गंज पोलीस ठाण्यात दिली आहे.
नोटीस मिळाल्यानंतर त्याने आर्थिक कर सल्लागाराच्या कार्यालयात जाऊन फॉर्म 26(एएस) मिळवला. तेव्हा त्यांच्या नावाने सिटी युनियन बँक लिमिटेड, कुटलममध्ये खाते चालवले जात असल्याचे उघड झाले. याच खात्यातून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले जात आहेत. त्या बदल्यात त्यावर 1 कोटी 25 लाख 84 हजार 800 रुपयांचा कर कापण्यात आला आहे.
मी कधीही कूटलमला गेलो नाही, मग खाते कसे उघडणार? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तसेच संबंधितावर कारवाई करवी अशी मागणी त्याने स्टेशन प्रभारींकडे केली आहे.
गेमिंग अॅप्सचा सर्वात मोठा धोका
वैयक्तिक कागदपत्रांच्या गैरवापराच्या अनेक तक्रारी समोर येत असतात. गेमिंग अॅप असलेले लोक याचा सर्वाधिक वापर करत आहेत. लोन अॅपवरूनही कागदपत्रे चोरीला जात आहेत, असे सायबर तज्ज्ञ सांगतात
'तो कधीही तामिळनाडूला गेला नाही, असे या तरुणाचे म्हणणे आहे, त्याची कागदपत्रे तेथे कशी पोहोचली आणि त्यांचा वापर कसा झाला, हा तपासाचा विषय आहे. तुम्ही कर्जाची अॅप्स डाउनलोड करता तेव्हा कागदपत्रे शेअर केली जातात, त्यामुळे अशी अप्स डाउनलोड न करणे चांगले. अशा अॅपला रिस्पॉन्सही करता कामा नये, असे बैतूलचे अतिरिक्त एसपी नीरज सोनी यांनी सांगितले.
अशा अॅप्समध्ये व्यक्तींना त्यांचे आधार आणि पॅन कार्ड अपलोड करण्याचा पर्याय असतो. कोणी डॉक्यूमेंट्स अपलोड केले की यातील माहिती चोरीला जाण्याचे प्रकार घडतात.