Laddu Mutya: सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही. गेल्यावर्षी धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडीओ सोशल मीडियात खूप व्हायरल होत होते. समोरच्याच्या मनात काय आहे, हे ते चिठ्ठीवर लिहून सांगत असल्याचा दावा करण्यात आला. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांची चर्चा झाली. सध्या सोशल मीडियात तुम्ही रिल्स पाहत असाल तर लड्डू मुत्या यांचे व्हिडीओ तुम्हाला नक्की पाहायला मिळाले असतील. कोण आहेत हे लड्डू मुत्या? कुठे राहतात? ते का व्हायरल होतायत? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया रिल्समध्ये एक व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. ज्यामध्ये एका कथित बाबांना काहीजण खांद्यावर उचलून घेत आहेत. या बाबांच्या डोक्यावरील पंखा सुरु आहे. यानंतर आपल्या हाताने ते हा पंखा थांबवतात. यानंतर हातात येणारी धूळ त्यांच्या भक्तांच्या माथी लावतात. बॅग्राऊंडला लड्डू मुत्या यांचे गाणे सुरु असते. या व्हिडीओपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी असे व्हिडीओ बनवले आहेत. त्यामुळे हा विषय चर्चेत आलाय. 



लड्डू मुत्या हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात राहतात. पण सध्या ते देशभरात प्रसिद्ध झाले आहेत. सोशल मीडियावर  त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या फॅन थांबवण्याच्या प्रकारामुळे लोकं त्यांना ट्रोलदेखील करत आहेत. असे असले तरी लड्डू मुत्या कोण आहेत? हे पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. 


काय म्हणतात लड्डू बाबा?



लड्डू मुत्या बाबा भाविकांना प्रवचनदेखील देतात, अशी माहिती समोर येत आहे. समाजात प्रत्येकाने चांगले काम केले पाहिजे. यामुळे आपले जीवन सार्थक होते, असे ते भाविकांना सांगतात. जर प्रत्येकजण आनंदी असेल तर आयष्य सुंदर होईल. आयुष्यात कठीण प्रसंग उभे राहिल्यास संपूर्ण विश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे धैर्य विकसित केले पाहिजे, असे आवाहन ते आपल्या भक्तांना करतात.


क्रिएटर्सकडून व्हिडीओ 


सोशल मीडियातील ट्रेण्ड फॉलो केला की फॉलोअर्स वाढतात, हे इन्स्टाग्रामचं गणित आहे. त्याप्रमाणे सोशल मीडियातील इन्फ्लूएन्सर लड्डू मुत्या बाबांच्या व्हिडीओची नक्कल करत आहेत. मोठ्या प्रमाणात यावर व्हिडीओ बनवले जात आहेत. त्यावर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रियादेखील येत आहे. 



(हा लेख केवळ माहितीसाठी असून झी 24 तास कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतीला खतपाणी घालत नाही)