Lalit Modi : गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचे (IPL) माजी अध्यक्ष ललित मोदी यांचे नाव चर्चेत आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपांमुळे ललित मोदी यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. अशातच आता ललित मोदी यांनी जेष्ठ वकील मुकूल रोहतगी (senior advocate Mukul Rohatgi) यांना थेट धमकी दिली आहे. मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊन विकू शकतो, असा इशारा ललित मोदी (Lalit Modi) यांनी दिला आहे. मुकूल रोहतगी यांचा एक फोटो पोस्ट करत ललित मोदी यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी पुन्हा नम्रपणे सांगणार नाही...


अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेले ललित मोदींनी भारतातून पळ काढला आहे. अशातच ललित मोदी यांनी जेष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना मला फरारी म्हणणे बंद करा अशी धमकी दिली आहे. "आदरणीय श्री रोहतगी जी, तुमचा नंबर माझ्याकडे नव्हता म्हणून कारण मी तुमचा कधीच वापर केला नाही. मला तुमच्याबद्दल कायमच आदर आहे. पण तुम्हाला माझ्याबद्दल फक्त तिरस्कार आहे. मला यापुढे आयुष्यात कधीही फरारी म्हणू नका ही माझी नम्र विनंती आहे. जर तुम्ही असेच करत राहिलात तर तुम्ही वकील सोडून विनोदी कलाकार बनाल. न्यायालयाने तसे म्हटले असते तर मी काहीही बोललो नसतो. त्यामुळे मी पुन्हा नम्रपणे सांगणार नाही," असा इशारा ललित मोदी यांनी दिला आहे.


देव माझे रक्षण करतो - ललित मोदी


"त्यामुळे माणुसकीचा आदर राखून बोलणे तुमच्या डीएनएमध्ये असेल, तर प्रत्येक पार्टीत, प्रत्येक गॉसिप सेशनमध्ये, असं काही बोलणे तुम्हाला शोभत नाही असे मला वाटते. माझी बाजू मांडण्यासाठी मला तुमची कधीच गरज भासली नाही. त्यासाठी माझ्याकडे सर्वोत्कृष्ट वकील हरीश साळवे आहेत. जर तुम्ही माझा सल्ला न ऐकण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला माहित नाही की मी देवाची आवडती व्यक्ती आहे आणि तो माझे रक्षण करतो," असे ललित मोदी म्हणाले.



मी मुंगीसारखा तुम्हाला चिरडणार नाही


"वकील रात्रीच न्यायाधीशांना खरेदी करून आपल्या ग्राहकांना न्याय मिळवून देऊ शकत असतील पण मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊन विकू शकतो. तुम्ही तुमच्या अशिलासाठी जमेल तितके लढा पण माझा उल्लेख करताना मला फक्त मिस्टर मोदी असेच म्हणा. हा एक अतिशय महत्त्वाचा सल्ला म्हणून घ्या. मला तुम्ही चेष्टा करता किंवा  किंवा तक्रार करता याबाबत कोणतीही अडचण नाही. तुमच्या काँग्रेसी बॉसला पूर्ण ताकदीने आणता येणार नाही हे तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात. तसेच तुम्ही भाग्यवान आहात की मला मुंग्या आवडतात. म्हणूनच मी तुम्हाला चिरडणार नाही. पण मी वचन देतो की कोणत्याही न्यायालयात मी तुमची पाठराखण करेन. जगभरात कुठेही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असे दिसते की माझ्याबद्दल असे काहीतरी म्हटले आहे. मला माहित आहे की तुम्ही तुमच्या अशिलांबद्दल गॉसिप करता. मी तेही मनावर घेणार नाही. जय हिंद," असेही ललित मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.