श्रीनगर : सुरक्षा दलानं आपल्या जीवाची बाजी लावत शुक्रवारी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी जुनैद मट्टू याच्यासहीत दोन दहशतवाद्यांना ठार केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण काश्मीरच्या बिजबहेडा भागातील एका गावात सुरक्षा दलानं सकाळी जवळपास ८ वाजल्याच्या सुमारास लष्कर कमांडर मट्टू आणि त्याच्या साथीदारांना एका घरात घेतलं. त्यानंतर झालेल्या गोळीबारात मट्टू आणि त्याचा एक साथीदार ठार झाला.


कोण होता जुनैद मट्टू?


मट्टूवर ५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. तो कुलगामच्या खुदवानी गावाचा रहिवासी होता. ३ जून २०१५ मध्यो तो दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. मट्टू शिक्षित होता आणि त्याला तंत्रज्ञानाची चांगलीच जाण होती.


- गेल्या वर्षी अनंतनाग पोलीस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यानंतर तो चर्चेत आला होता.


- गेल्या वर्षी जून महिन्यात बीएसएफच्या बसवर झालेल्या हल्ल्यातही त्याचा सहभाग होता.


- जून २०१६ मध्ये एका गजबजलेल्या बसस्टँडवर त्यानं दोन पोलिसांची दिवसा-ढवळ्या हत्या केली होती. यावेळी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.


- सेनेनं नुकत्याच फोटोसोहत जाहीर केलेल्या १२ दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये त्याच्या नावाचाही समावेश होता.


एका घरात तीन दहशतवादी आसरा घेऊन कटकारस्थान रचत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलानं अरवानी गावातील मलिक मोहल्ला नावाच्या भागातील एका घराला वेढा घातला.


यावेळी सुरक्षा दलावर दगडफेकीचा आणि ऑपरेशन उधळून लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. १० वाजता पहिली गोळी झाडली गेली. यावेळी, सुरक्षा दलाला पेलेट गनचाही वापर करावा लागला. 


यापूर्वी गेल्या महिन्यात सुरक्षा दलानं हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याची जागा घेणाऱ्या सबजार अहमद बट याला ठार केलं होतं.