जम्मू काश्मीर : लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिदायतुल्ला मलिक याला जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी संबंधीत घटनेची माहिती दिली आहे. हिदायतुल्ला मलिक दहशदवादी हल्ला घडवण्याच्या विचारात होता, प्राथमिक चौकशीत अशी माहिती समोर आली आहे . जम्मूच्या कुंजवानीजवळ दहशतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात यश आल्याची माहिती जम्मूचे एसएसपी श्रीधर  पाटील यांनी दिली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, त्याच्यावर अटकेची कारवाई करतेवेळी त्याने पोलिसांवर हल्ला देखील केला होता. दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला अटक केल्यामुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्वपूर्ण माहिती भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता आहे. 



महत्त्वाचं म्हणजे कायम दहशदवादी हल्ले घडवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचीच लष्कर-ए-मुस्तफा ही संघटना आहे. त्यामुळे संघटनेच्या प्रमुखाला अटक केल्यामुळे भारतीय लष्कराला मोठं यश आलं. यावेळी त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड देखील हस्तगत करण्यात आलं आहे.