त्या खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी
Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: लॉरेन्स बिश्नोई गँगने फेसबुकवरुन या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेकेची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सुक्खावर पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये एकूण 20 हून अधिक गुन्हे दाखल होते. यापैकी काही प्रकरण अंडर ट्रायलर तर काहींचा तपास सुरु आहे. सिक्खा हा पंजाबमधील मोगाचा रहिवाशी होता. खोट्या पासपोर्टच्या आधारे तो 2017 मध्ये कॅनडात पळून गेला होता. सुक्खाचे चुलते, आई आणि बहीण कॅनडामध्येच वास्तव्यास आहेत.
मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत होता समावेश
राष्ट्रीय तपास यंत्रणेने जारी केलेल्या 41 दहशतवादी आणि गँगस्टरच्या यादीमध्ये सुक्खाचा समावेश होता. सिक्खावर अज्ञात हल्लेखोरांनी विग्निपेगमध्ये हल्ला केला. या हल्लेखोरांनी सिक्खावर 20 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सिक्खाचा जागीच मृत्यू झाला. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्खा खलिस्तान समर्थकांबरोबर काम करत होता. गुप्त माहितीनुसार सुक्खा दविंद्र बंबीहा गँगचा सदस्य होता. मात्र तो प्रामुख्याने खंडणी मागणे, लोकांना धमकावणे आणि सुपऱ्या घेऊन हत्या करण्याची कामं करायचा. सुक्खा आणि त्याच्या टोळीतील इतर लोक हे वेगवेगळ्या राज्यांमधील मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत आहेत.
काय म्हटलंय बिश्नोई गँगने
लॉरेन्स बिश्नोई गँगने फेसबुकवर सिक्खाच्या हत्येनंतर पोस्ट केली आहे. "हांजी सत् श्री अकाल, सर्वांना राम राम. बंबीहा ग्रुपचा प्रमुख बनून फिरत असलेल्या सुक्खा दुनेकेची कॅनडामधील विनिपेगमध्ये हत्या झाली. त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्रोई गँग घेत आहे. हेरॉइनचं व्यसन असलेल्या या नशेखोराने केवळ पैशांसाठी अनेक घरं उद्धवस्त केली. आमचे भाऊ गुरलाल बरडा, विक्की मिड्ड्डूखेडाची हत्या करण्यात याचा हात होता. संदीप नंगल अंबियाची हत्याही त्यानेच घडवून आणली होती. त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली. एकच गोष्ट सांगायची होती की जे काही 2-3 जण राहीले आहेत ते कुठेही पळालेत. जगातील कोणत्याही देशात लपले तरी आपलं वैर संपणार नाही. नक्कीच वेळ कमी जास्त लागू शकतो मात्र प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
14 मार्चला भारतात सुक्खाने घडवून आणलेला हल्ला
मागील वर्षीच सुक्खाने पंजाबमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने प्राणघातक हल्ला केला होता. 14 मार्च रोजी सुक्खाने जलंधरमधील सहकाऱ्यांच्या मदतीने मल्लिया गावात एका कब्बडी सामन्यादरम्यान खेळाडू संदीप सिंग नंगलची हत्येचा कट रचला होता. यानंतर पंजाब पोलिसांनी या टोळीतील सदस्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 20 गुन्हे दाखल केले होते. गुप्तचर एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, भारताविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआय कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना आर्थिक मदत करत आहे. कॅनडामधील खलिस्तानी नेते, खास करुन खलिस्तानी लिबरल पार्टी आणि न्यू डेमोक्रेटिक पार्टीला वैंकूवर येथे आयएसआय एजंट्सच्या माध्यमातून नियमितपणे अर्थ पुरवठा केला जातो असं वृत्त न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
नक्की वाचा >> कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'
3 महिन्यांपूर्वीच झालेली हरदीप सिंग निज्जरची हत्या
18 जून रोजी कॅनडामधील सुरे येथे हरदीप सिंग निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर कॅनडामधील सिख फॉर जस्टिस आणि खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवादी असलेल्या निज्जरवर 10 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं.
हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या हत्येमध्ये भारताचा सहभाग होता असा कॅनडीयन पंतप्रधानांनी आरोप केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असून भारताने ते फेटाळले आहेत. या प्रकरणावरुन दोन्ही देशांमधील संबंध आणखीन ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.