Leaders : एक अशी IAS अधिकारी ज्यांचा डान्स पाहून लोकं होतात हैराण, थक्क करणारा प्रवास
कविता रामू या तामिळनाडू केडरच्या IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत देशात आणि परदेशात 600 हून अधिक स्टेज परफॉर्मन्स केले आहेत.
मुंबई : यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झालेल्या कविता रामू या जरी प्रशासकीय सेवेत असल्या तरी भरतनाट्यम (Bharatnatyam) ही त्यांची आवड आहे. पायांना घुंगरू बांधून कविता स्टेजवर नाचायला लागल्या की लोक थक्क होतात. कविता रामू आयएएस अधिकारी असण्यासोबतच देशातील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना (Bharatanatyam Dancer) म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. (IAS officer Kavitha ramu)
आतापर्यंत 600 हून अधिक स्टेज परफॉर्मन्स
कविता रामू या तामिळनाडू केडरच्या IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत देशात आणि परदेशात 600 हून अधिक स्टेज परफॉर्मन्स केले आहेत. कविता रामू (Kavitha Ramu) यांना यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. याशिवाय त्यांनी प्रशासकीय सेवेतही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्या वेल्लोरमध्ये महसूल विभागीय अधिकारी आहेत आणि चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त नागरी पुरवठा म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी तामिळनाडू राज्य पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक पदही भूषवले आहे.
ड्युटीसोबत नाचण्यासाठी वेळ काढणे सोपे नाही
प्रशासकीय सेवेसोबतच भरतनाट्यमसाठी वेळ काढणे कविता रामू यांच्यासाठी सोपे नाही आणि त्यांना वेळेचे व्यवस्थापन करताना खूप काळजी घ्यावी लागते. कविता सांगतात की त्या पहाटे पाच वाजता उठतात आणि योगा करून दिवसाची सुरुवात करतात. यानंतर, त्या 9 वाजता ऑफिसला निघतात, तेथून त्या रात्री 8 वाजताच परत येऊ शकतात. त्यांना नोकरीतून मोकळा वेळ मिळेल तेव्हा त्या भरतनाट्यमचा सराव करतात.
आईने दिले भरतनाट्यमचे धडे
द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, तामिळनाडूच्या मदुराईमध्ये जन्मलेल्या कविता रामू यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. त्यांची आई मनिमेगली त्यांना नृत्य शिकवू लागल्या. आईच्या सांगण्यावरून कविता यांनी मदुराईच्या प्रसिद्ध नृत्यांगना नीला कृष्णमूर्ती यांच्याकडून नृत्य शिकण्यास सुरुवात केली. 1981 मध्ये, वयाच्या आठव्या वर्षी, कविता यांनी चिदंबरम शहरात झालेल्या पाचव्या जागतिक तमिळ परिषदेत सादरीकरण केले आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीने मने जिंकली.
वडिलांचा प्रभाव
कविता रामू यांचे वडील एम रामू आयएएस अधिकारी होते. कवितावर तिच्या वडिलांचा खूप प्रभाव होता आणि त्यांना वडिलांप्रमाणे आयएएस व्हायचे होते. कुटुंबीयांच्या पाठिंब्यानंतर कविता यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 1999 मध्ये, त्यांची तामिळनाडू राज्य नागरी सेवांमध्ये निवड झाली, तरीही त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू ठेवली. 2002 मध्ये, कविता यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यानंतर त्यांची आयएएस म्हणून निवड झाली.