केरळमध्ये ओणमला चांद्रयान-3 साठी खर्च आला, त्यापेक्षा जास्त किंमतीची दारु लोकांनी प्यायली; `जवान`ला सर्वाधिक पसंती
केरळमध्ये ओणमला रग्गड दारुविक्री झाली आहे. इतक्या खर्चात भारत आणखी चांद्रयान 3 चंद्रावर पाठवू शकेल. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या केरळला कोटींमध्ये झालेल्या या दारुविक्रीने थोडा दिलासा मिळाला आहे.
केरळ सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पण अशा स्थितीतही ओणम सण साजरा करणाऱ्या या राज्याने इतकी दारु रिचवली आहे, की तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकणार नाही. केरळमध्ये ओणम सण साजरा केला जात शनिवारपर्यंत हे सेलिब्रेशन सुरु राहणार आहे. यादरम्यान केरळमध्ये तब्बल 759 कोटींची मद्यविक्री झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला यापेक्षा कमी खर्च आला होता. चांद्रयान 3 साठी फक्त 600 कोटी खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच, चांद्रयान मोहिमेसाठी खर्च आला त्यापेक्षाही 159 कोटी जास्त किंमतीचं मद्य विक्री झालं आहे. थोडक्यात जितक्या किंमतीची दारुविक्री झाली आहे, त्यात भारत आणखी एक चांद्रयान चंद्रावर पाठवेल.
केरळ राज्य पेय निगमने (Bevco) 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत विक्रमी-उच्च विक्री नोंदवली आहे. विशेष म्हणजे ओणमच्या निमित्ताने बुधवारी आणि गुरुवारी दारूची दुकाने बंद होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीत 8.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ओणमच्या पूर्वसंध्येला, उथरादमला बेव्हकोने दारूच्या विक्रीतून 116 कोटी रुपयांची कमाई करून सर्वाधिक विक्री नोंदवली.
केरळमधील जवान हा स्थानिकांमधील आवडीचा ब्रँड आहे. ओणमलाही मद्यपींना याच ब्रँडला पसंती दिल्याचं दिसून आलं. 10 दिवसात जवान ब्रँडच्या तब्बल 70 हजार बाटल्यांची विक्री झाली.
तिरूर, मलप्पुरममधील सर्वात लोकप्रिय आउटलेटपैकी एक असून तिथे सर्वाधिक विक्री झाली आहे. त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजलाकुडा दुसऱ्या क्रमांकावर होते. इरिंजलाकुडा येथील दुकानात 1.06 कोटी रुपयांची विक्री झाली असून, अव्वल स्थानावर आहे. केरळ राज्यात सध्या आर्थिक संकट निर्माण झालं असताना, मद्याची रेकॉर्डब्रेक विक्री राज्य सरकाराल दिलासा देणारी आहे.
केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या सणाने सुरू होतं. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रवण नक्षत्र येईल त्या दिवशी हा सण साजरा करतात. 10 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवातील 10 वा दिवस तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो. ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे. यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते. या सणासाठी नवीन कपडे घातले जातात. तसंच पारंपारिक खाद्यपदार्थही केले जातात. सर्व जाती धर्माचे लोक हा सण साजरा करतात.