नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत आहे. आता काँग्रेसने आपली यादी जाहीर केली. भाजप, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसने महाराष्ट्रासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ४० नावांचा समावेश आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, विखे-पाटील आपल्या मुलाविरोधात डॉ. सुजय विरोधात प्रचार करणार का, हा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रामध्ये देखील स्टार प्रचारक म्हणून प्रियंका गांधी मैदानात उतरणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांनी गेल्या आठवड्यामध्ये रॅली घेत जनमत आजमावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आता महाराष्ट्रातही प्रचाराची जबाबदारी प्रियंका गांधींवर असणार आहे.


काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह ४० नावांचा समावेश करण्यात आला आहे.