नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसच्या काळात भारतासाठी 20 लाख कोटींच्या विशेष निधीची घोषणा केली. अर्थमंत्री निर्माला सितारमण आर्थिक पॅकेजच्या तिसर्‍या टप्प्यातील तपशील देत आहेत. शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. पूर आणि दुष्काळातही शेतकरी झटला. शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्येही अन्नधान्याचा पुरवठा केला. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं. कृषी उद्योगाला 1 लाख कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी पॅकेज देण्यात येत आहे. शेती, सिंचन, पशुपालन, मच्छीमारी यांसाठी आज पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.


2 कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देणार, खाद्यपदार्थांच्या लघू उद्योगांना मदत, लघू उद्योगांना 10 हजार कोटींची मदत, डेअरी कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट, मत्स्य उद्योगासाठी 20 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. मच्छिमार आणि नाविकांचा विमा काढला जाणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. 


हर्बल आणि औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. 10 लाख हेक्टरमध्ये हर्बल शेती केली जाणार असून औषधी वनस्पती लागवडीसाठी 4 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. 


मधमाशी पालनासाठी 500 कोटींची योजना असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.


पाळीव प्राण्याच्या लसीकरणासाठी मदत केली जाणार असून 53 कोटी जनावरांना लस दिली जाणार असल्याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली. पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी 13 हजार 300 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. 


लघु आणि मध्यम शेतकऱ्यांकडे 85 टक्के शेती आहे. देशातील मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक कामं केली आहेत. 


अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 महिन्यांत शेतकऱ्यांना 18700 कोटी रुपये देण्यात आले. पीक विमा योजनेंतर्गत 6400 कोटींचं वितरण करण्यात आलं.