देशात लॉकडाऊन ४.० जाहीर होण्याची शक्यता, गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन
देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपतोय. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपतोय. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालय त्याबाबत निर्देश जाहीर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. चौथा लॉकडाऊन हा आत्तापर्यंत जाहीर झालेल्या तिनही लॉकडाऊनपेक्षा वेगळा असेल, याचे संकेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिवसभर विविध बैठका घेतल्या. लॉकडाऊन ४.० संदर्भात या बैठका झाल्या. शुक्रवारी नॉर्थब्लॉकमध्ये अमित शाह तब्बल पाच तास उपस्थित होते. या सर्व बैठकांना त्यांच्यासह गृहसचिव अजय भल्लाही उपस्थित होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये संपूर्णपणे नवे नियम असतील असं पंतप्रधानांनी नुकतंच जाहीर केले होते.
लस विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपये
भारतातही करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारी लस शोधण्यासाठी संशोधन सुरु आहे. केंद्र सरकारने करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी पीएम केअर्स फंडातून १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. बायोटक्नोलॉजी विभागाच्या माहितीनुसार वैद्यकीय संस्था, स्टार्ट अप यांच्या माध्यमातून लस संशोधनाच्या २५ प्रकल्पांवर भारतात काम सुरु आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या चीनपेक्षा अधिक
ज्या देशातून कोरोनाचा फैलाव झालाय त्या चीन देशाला भारतानं मागे टाकलंय. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनपेक्षा अधिक झालीय. शुक्रवारी रात्री हाती आलेल्या आकडीवारून भारताने ८५ हजारांचा आकडा पार केलाय. तर चीनमध्ये ८४ हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद आहे.
देशातील सर्वच रुग्णालायत कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे इतर आजारी रुग्णांचे हाल होत आहेत. संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा कोरोना रोखण्यात गुंतली आहे. त्यामुळे इतर रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. भारतात ५ लाख ८० हजार रुगांवरील शस्त्रक्रीया रद्द होण्याची शक्यता आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ सर्जरीमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.