Lockdown : प्रसूतीनंतर `ती` माय १५० किलोमीटर चालली
ती मजुरीचं काम करत होती...
नाशिक : Coromavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. ज्यानंतर अनेत स्तरांतून याविषयीच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या प्रतिक्रियांमध्ये काळजी, आर्तता आणि हतबलतेचाच सूर जास्त होता. आपल्या नवजात बाळाला घेऊन तब्बल १५० किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या शकुंतचाच्या हतबलतेची अशीच कहाणी.
शकुंतला या आपल्या अवघ्या आठ दिवसांच्या बाळासोबत सध्या रुग्णालयात आहे. ती तिच्या पतीसमवेत नाशिकमध्ये मजुरीचं काम करायची. पण, लॉकडाऊन जाहीर झालं त्यातच काम आणि हाताशी असणारा पैसा संपल्यानंतर या जोडीने पायीच प्रवास करण्याचा निर्णय घेत मध्यप्रदेशमधील त्यांच्या गावाची वाट धरली.
शकुंतला या काळात गरोदर होती. ऐन नवव्या महिन्यात ती पायपीट करत निघाली. वाटेतच तिची प्रसूती झाली, सोबत असणाऱ्या चार महिलांनी तिची प्रसूती केली. बाळाच्या जन्मानंतर तिने जवळपास अवघ्या एक-दोन तासांसाठी रस्त्यावरच विश्रांती घेतली आणि लगेचच पुढचा प्रवास सुरु केला.
TDS पासून EPF पर्यंत, वाचा अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा
काही तासांपूर्वीच बाळंत झालेली ही शकुंतला तब्बल दीडशे किलोमीटर पायी चालली. मध्यप्रदेशच्या सीमेनजीक आल्यानंतर शकुंतलाविषयी प्रशासनाला माहिती मिळाली. ज्यानंतर प्रशासनाकडून या कुटुंबासाठी एका खास बसची सोय करण्यात आली. सतनाचे जिल्हाधिकारी आणि रेड क्रॉस सोसायटीनं या कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदतही केली.
बाळाला जन्म दिल्यानंतरच्या प्रचंड वेदना दूर सारत शकुंतलाने तिचा प्रवास सुरुच ठेवला होता. तिच्या धाडसाची दाद द्यावी तितकी कमीच.