लॉकडाऊन नसता तर एवढी असती भारतातली रुग्णसंख्या
देशात कोरोनाचा फैलाव वेगात होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सर्वात महत्त्वाचं ठरलं.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शुक्रवारी पार पडलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत, देशात लॉकडाऊन केले नसते तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले असते, असे सांगितले. लॉकडाऊनच्या परिणामांचा अंदाज वेगवेगळ्या संस्था घेत आहेत असल्याचेही सांगण्यात आले.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज देशात लॉकडाऊन करण्यात आले नसते तर, कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या देशभरात जवळपास 36 ते 70 लाखपर्यंत पोहचू शकली असती. लॉकडाऊनमुळे 50 हजारहून अधिक लोकांचा जीव वाचवता आला आहे. कोरोना व्हायरसची 23 लाख प्रकरणं टाळली गेली आहेत. एकूण मिळून याचा अंदाज लावल्यास लॉकडाऊनमुळे 14-29 लाख कोरोना केसेस आणि 37-78 हजार लोकांचं जीवन वाचवण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात रिकव्हरी रेट वाढतो आहे. हा रेट जवळपास 41 टक्क्यांवर पोहचला आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आहेत, त्या ठिकाणी अधिक लक्ष दिले जात आहे. देशात आतापर्यंत 48 हजार 534हून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत 3334 रुग्ण बरे झाले आहेत.
देशातील मृत्यू दर 3.02 टक्के इतका आहे. ICMRकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील सॅम्पल टेस्टिंगची संख्या दररोज वाढवली जात आहे. आतापर्यंत देशात 27 लाख 55 हजार 714 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
नीति आयोगच्या सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं की, देशातील 80 टक्के कोरोना रुग्ण 5 राज्यांमध्ये आहेत. 90 टक्के रुग्ण 10 राज्यांमध्ये आहेत. आपल्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे. सोशल डिस्टंन्सिंगचं अतिशय कठोरपणे पालन करणं गरजेचं आहे. देशात कोरोनाचा फैलाव वेगात होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सर्वात महत्त्वाचं ठरलं. सर्वाधित लक्ष ग्रामीण भागाकडे आहे. तिथे कोरोनाचा संसर्ग रोखायचा आहे. आपल्या देशाने लॉकडाऊनचा निर्णय वेळेत घेतला. 3 एप्रिलपर्यंत कोरोना केसेसमध्ये वेगात वाढ होत होती. 4 एप्रिलच्या जवळपास लॉकडाऊनमुळे हा वेग कमी झाला आहे. कोरोना केसेस वाढत असल्या तरीदेखील आधीचा वेग असता तर आज कोरोना रुग्ण अधिक असते आणि परिस्थिती वेगळी असती. आज 13.3 डबलिंग रेट आहे.