बिहार : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार हा बेगूसराय लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. निवडणूक आयोगाकडे त्याने आपली संपत्ती जाहीर केली आहे. 2018-19मध्ये त्याचे एकूण उत्पन्न 2 लाख 28 हजार 290 रुपये इतके होते. तर 2017-18 मध्ये त्याचे उत्पन्न 6 लाख 30 हजार 360 रुपये दाखवले आहे. या हिशोबाने त्याच्याकडे साधारण 8.5 लाखाची संपत्ती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कन्हैयाने निवडणूक आयोगाकडे जाहीर केलेल्या संपत्तीनुसार त्याच्याकडे 24 हजाराची कॅश आहे. त्याच्या एका बॅंक खात्यात 1 लाख 63 हजार 648 रुपये आणि दुसऱ्या खात्यात 50 हजार रुपये जमा आहेत. याशिवाय 1 लाख 70  हजार 150 रुपयांची सेव्हिंग आहे. कन्हैय्याने स्वत:ला बेरोजगार दाखवले असून पुस्तके आणि विविध ठिकाणी घेतलेल्या व्याख्यानांची रॉयल्टी हे उत्पन्नाचे साधन असल्याचे म्हटले आहे. आपल्यावर 5 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेखही त्याने केला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना त्याच्यावर हे गुन्हे दाखल झाले होते. यानंतर कन्हैया एका रात्रीत देशभरात पोहोचला होता.


अचल संपत्ती 


 कन्हैयाने आपल्याकडील अचल संपत्तीचा देखील उल्लेख केला आहे. आपल्याकडे वडीलोपार्डित संपत्ती असल्याचे त्याने म्हटले आहे. दीड एकर जमिनीवर एक दुकान असून त्याची आजच्या तारखेला 2 लाख इतकी किंमत असल्याचे कन्हैयाने म्हटले आहे. 


क्राऊड फंडींगने 70 लाख 


 कन्हैया कुमारने निवडणूक लढण्यासाठी क्राऊड फंडींगच्या माध्यमातून 70 लाख रुपये गोळा केले आहेत. त्याने 26 मार्चला www.ourdemocracy.in नावाची वेबसाईट सुरू केली होती. ज्यामध्ये 11 दिवसांत 70 लाख गोळा झाले. कन्हैयाने स्वत:ट्वीट करुन ही माहिती दिली. 


29 एप्रिलला मतदान 


या निवडणुकीत जनता आणि लोकशाहीचा विजय होईल आणि नोटशाहीचा पराभव होईल असे कन्हैयाने म्हटले आहे. नैतिकरित्या ही लढाई आपण याआधीच जिंकल्याचे तो सांगतो. आता बेगूसरायच्या लोकांना जिंकणे बाकी आहे. या ठिकाणी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. भाजपाचे गिरिराज सिंह आणि आरजेडीहून तन्वीर हसन या ठिकाणाहून रिंगणात आहेत. तन्वीर या लढाईतच नसल्याचे कन्हैयाचे म्हणणे आहे. आपली लढाई ही गिरिराज यांच्याशी असल्याचे कन्हैया सांगतो.