`केजरीवालांच्या कानाखाली का मारली ?` त्या इसमाच्या बायकोचे स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केल्याने तो केजरीवालांवर नाराज होता.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मोतीनगरच्या कर्मपूरा येथे आम आदमी पार्टीचे लोकसभा उमेदवार बृजेश गोयल यांचा प्रचार करत होते. यावेळी एका तरुणाने त्यांच्या जीपवर चढून केजरीवालांना थप्पड लगावली. सुरेश असे या तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेशची पत्नी ममताने या थप्पड लगावण्या मागचे कारण सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केल्याने तो केजरीवालांवर नाराज होता. यामुळेच त्याने असे मोठे पाऊल उचलल्याचे सुरेशच्या पत्नीने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल यांच्याबद्दल आपत्तीजनक विधान केलेले सुरेशला आवडत नाही. काही दिवसांपूर्वी आमदार शिवचरण गोयल प्रचारा दरम्यान आमच्या घरी आले होते. तेव्हा ते पंतप्रधान मोदींबद्दल वाईट बोलले होते. यानंतर सुरेश खूप नाराज होता. जो कोणी उमेदवार चांगले काम करणार नाही आणि जनतेची सेवा करणार नाही त्याला जनताच उत्तर देईल असे सुरेशचे भावोजी हंसराज राठौर यांनी म्हटले.
पण सुरेश असे करेल असे मला वाटले नव्हते असेही हंसराज म्हणाले. सुरेश कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडला गेलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात विकास काम झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.