राहुल गांधींनी सोनियांकडून घेतलं कर्ज, पाहा किती आहे संपत्ती
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरु आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या जोरात सुरु आहे. प्रत्येक राजकीय पक्ष प्रचारसभांच्या माध्यमांमधून विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. तर उमेदवार निवडणूक आयोगाला त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाडमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राहुल गांधी यांनी आपली आई सोनिया गांधी यांच्याकडून ५ लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज घेतल्याचं सांगितलं आहे. राहुल गांधी यांच्याकडे एकूण ७२,०१,९०४ रुपयांचं कर्ज आहे. ५ लाखांचं सोनिया गांधींकडून घेतलेलं कर्ज वगळता उरलेललं कर्ज हे त्यांनी भाड्याने दिलेल्या जमिनीचं डिपॉजिट आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांची स्थावर मालमत्ता १०,०८,१८,२८४ एवढी आहे. यातल्या सुलतानपूरमधल्या शेतजमिनीची किंमत १,३२,४८,२८४ रुपये एवढी आहे. तर गुरुग्राममध्ये असलेल्या दोन व्यावसायिक कार्यालयाची किंमत ८,७५,७०,००० एवढी आहे. यातली सुलतानपूरची शेतजमीन ही वडिलोपार्जित आहे.
राहुल गांधी यांची जंगम मालमत्ता ५,८०,५८,७७९ एवढी आहे. यातले ४० हजार रोख रक्कम आहे. तर बँक, आर्थिक संस्था यांच्यामध्ये १७,९३,६९३ रुपयांची गुंतवणूक आहे. राहुल गांधींच्या नावावर बॉन्ड, डिबेन्चर्स आणि शेअर्समध्ये ५,१९,४४,६८२ रुपये आहेत. तर एनएसएस, पोस्टातली गुंतवणूक ३९,८९,०३७ रुपये एवढी आहे. राहुल गांधी यांच्याकडे २,९१,३६७ रुपयांचे दागिनेही आहेत.
राहुल गांधींची मागच्या ५ वर्षांमधली कमाई
२०१७-१८- १,११,८५,५७० रुपये
२०१६-१७- १,०७,५७,७८० रुपये
२०१५-१६- ८६,५५,६६० रुपये
२०१४-१५- ९५,३२,७१० रुपये
२०१३-१४- १,०३,७६३ रुपये
मुलायम सिंग यांच्यावर २.१३ कोटी रुपयांचं कर्ज
उत्तर प्रदेशच्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या मुलायम सिंग यादव यांनी त्यांचा मुलगा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून २.१३ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. एवढच नाही तर त्यांनी दुसरी पत्नी साधना यादव यांच्याकडून ६.७५ लाख रुपयांचं, मुलगा प्रतीककडून ४३.७ लाख रुपयांचं आणि आणखी एक नातेवाईक मृदुला यादव यांच्याकडून ९.८ लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे.
भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे पटणा साहिब मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाकडून १०.६ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर मुलगा लव सिन्हाकडून त्यांनी १० लाखांचं कर्ज घेतलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नी पूनम सिन्हा यांना जवळपास ८० लाख रुपयांचं कर्ज दिलं आहे. पूनम सिन्हा यादेखील आपली मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या १६ कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या कर्जदार आहेत.
चंडीगडमधून भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री किरण खेर यांनी मुलगा सिकंदर खेरकडून २५ लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे.