नांदेड : 'पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मारणार नाहीत' अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना घरचा आहेर दिला. नांदेडमध्ये आठवले पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. केंद्राने विविध योजनांसाठी 2 हजार कोटी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडॅणवीस म्हणाले होते पण प्रत्यक्षात तो निधी मिळाला नाही याबाबत पत्रकरांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला ऊत्तर देतांना रामदास आठवले यांनी पंतप्रधानांनाच चिमटा काढला. पुन्हा सरकार आल्याशिवाय त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या त्यांना पुर्ण करता येणार नाहीत, पुन्हा एकदा संधी मिळाली की नंतर ते थापा मारणार नाहीत असे आठवले म्हणाले.


'कमी जागा मिळतील'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवलेंनी भाजपाला घरचा आहेर देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लोकसभेच्या ०७ टप्प्यातील मतदानानंतर भाजप आणि एनडीएला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात फटका बसेल अशी शक्यता आठवले यांनी व्यक्त केली होती. लातूरमध्ये दुष्काळ दौऱ्यावर असताना ते झी २४ तासशी बोलत होते. केंद्र सरकारने महाराष्ट्राला दुष्काळ मदत जाहीर केल्यानंतर केंद्रातील मंत्री हे दुष्काळग्रस्त भागातील दौऱ्यावर आहेत.



केंद्रीय सामाजिक-न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे ही दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. लातूर जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा आठवले यांनी केला. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जैन समाजाच्या दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकमेव चारा छावणीला त्यांनी भेट दिली.