नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट होती. मात्र, यंदा मोदींची त्सुनामी येईल, असे वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केले. काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतरच्या काळात गंभीर काश्मीर प्रश्नावर वारंवार भूमिका घेताना दिसून आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंभीरने नुकतेच ट्विटरवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती कलंक असल्याचे म्हटले. त्यामुळे संतापलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनी गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रसारमाध्यमांनी गंभीरला प्रतिक्रिया विचारली. तेव्हा गंभीरने म्हटले की, मेहबुबा मुफ्ती मला ब्लॉक करू शकतात. मात्र, त्या १३० कोटी भारतीयांना कसे ब्लॉक करणार आहेत? मेहबुबा मुफ्ती नेहमी सीमेपलीकडच्या गोष्टी सांगत असतात. मात्र, यावेळी त्या देशातील लाटेविरुद्ध पोहायला गेल्या तर निश्चित बुडतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट होती. मात्र, यंदा त्सुनामी येईल, त्याला विकासाची साथही असेल, असे गंभीरने म्हटले. 



काही दिवसांपूर्वी मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. ३७० कलम रद्द झाल्यास संविधानाचा प्रभाव संपेल. ही गोष्ट ज्या भारतीयांना समजत नाही तेदेखील नष्ट होतील, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा गंभीरने समाचार घेतला होता. हा भारत आहे आणि तो नष्ट व्हायला तुमच्यासारखा कलंक नाही, अशी टीका गंभीरने केली होती.