Lok Sabha Nivadnuk 2024 Full Schedule: लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. देशात लोकसभेचे निवडणूक 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान पार पडणार आहे. एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. केंद्रामध्ये पुन्हा कोण सत्तेत येणार हे 4 जून रोजी लागणाऱ्या निकालामधून स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सुखबीर सिंह यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारही यावेळी उपस्थित होते.


काय म्हणाले निवडणूक आयुक्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आम्ही निवडणूक आयोगामधील सर्व अधिकारी या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहोत. त्यामुळे भारतीयांनीही मोठ्या संख्येनं या निवडणुकीच्या मतदानामध्ये सहभागी होऊन आपल्या बोटांना शाई लावून घ्यावी असं आवाहन केलं आहे. 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी निवडणुका पार पाडणं ही आमची जबाबदारी आहे. या निवडणुका लोकशाही मार्गाने पार पडाव्यात यासाठी पोषक वातावरण देण्याची आमची जबाबदारी आहे, असं राजीव कुमार म्हणाले. देशभरातील 800 हून अधिक जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वत: चर्चा केली आहे, असंही राजीव कुमार म्हणाले आहेत. निवडणुका पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्षपणे होतील असं आश्वासन निवडणूक आयुक्तांनी दिलं.


एनडीए विरुद्ध इंडिया लढाई


भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीदरम्यान थेट लढत होणार आहे. अनेक निवडणूकपूर्व चाचण्यांनी देशात तिसऱ्यांदा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा निवडणूकपूर्व चाचण्यांचा कल सांगतो. महाराष्ट्रामध्येही महायुतीच्या बाजूने जनतेचा कल असल्याचं निवडणूकपूर्व चाचण्यांमध्ये दिसत आहे. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीच्या कोण कोणाला मात देतं आणि देशात कोणाची सत्ता येते हे स्पष्ट होईल.


महाराष्ट्रात मतदान कधी?


महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.


निवडणुकीचे टप्पे


पहिला टप्पा - 19 एप्रिल 21 राज्यांमध्ये मतदान होणार


दुसरा टप्पा - 26 एप्रिल रोजी एकूण 21 राज्यांमध्ये मतदान होणार


तिसरा टप्पा - 7 मे रोजी एकूण 12 राज्यांमध्ये मतदान पार पडणार


चौथा टप्पा - 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे.


पाचवा टप्पा - 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.


सहावा टप्पा -  25 मे रोजी मतदान पार पडणार आहे.


सातवा टप्पा -  1 जून रोजी मतदान पार पडणार आहे.


भारतामधील मतदार किती?


भारतात होणारी लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वाधिक मतदार असलेल्या देशातील निवडणूक ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील 96 कोटी 88 लाख लोक मतदान करण्यास पात्र आहे. 97 कोटी लोकांपैकी 47 कोटी 10 लाख महिला आहेत. मतदानासाठी पात्र असलेल्या भारतीयांमध्ये 49 कोटी 70 लाख पुरुष आहेत. भारतामध्ये 48 हजार 44 तृतीयपंथी मतदार आहेत.  देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल 10.5 लाख मतदानकेंद्र उभारली जाणार असल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. मतदानासाठी पात्र असलेले 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या 1 कोटी 84 लाख इतकी असल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं. 82 लाख प्रौढ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. 100 वर्षांपेक्षा अधिक वयोगटाचे 2 लाखांहून अधिक मतदार आहेत. मागील म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90 कोटी भारतीय मतदान करण्यासाठी पात्र होते. त्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये 6 कोटींहून अधिक मतदारांची भर पडली आहे. 1.5 कोटी निवडणूक अधिकारी या निवडणुकीचं काम पाहणार आहेत. 55 लाख ईव्हीएम वापरल्या जाणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे.


नक्की वाचा >> ...तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला


बहुमताचा आकडा किती?


लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान होणार आहे. पूर्वी ही संख्या 545 इतकी होती. मात्र अँगलो इंडियन समाजासाठी राखीव जागांची तरतूद रद्द करण्यात आल्याने खासदारांचा आकडा 543 इतका आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणजेच बहुमतासाठी या 543 जागांपैकी किमान 50 टक्के जागा जिंकणं बंधनकारक आहे. म्हणजेच 272 जागा जिंकल्यास सत्तास्थापनेचा दावा करता येतो. बहुमत असेल तर सरकारला विधेयकं संमत करणं सहज शक्य होतं. लोकसभेमध्ये अर्ध्याहून अधिक जागा जिंकणारा पक्ष राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो.