मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्याच्या घडीला सत्तेत असणाऱ्या भाजपावर सातत्याने टीका करणाऱ्या प्रकाश राज यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत. आपला हाच पराभव पाहता आणि भाजपाची देशातील एकंदर भक्कम स्थिती पाहता ही आपल्या तोंडावर मिळालेली एक चपराकच आहे, असं म्हणत प्रकाश राज यांनी नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पराभवाचा सामना करणाऱ्या राज यांनी आपला सत्ताधारी पक्षाला असणारा विरोध  हा कायम तसाच राहील असंही स्पष्ट केलं. 'ही तर माझ्या तोंडावर मिळालेली जोरदार चपराक आहे. मोठ्या प्रमाणावर खिल्ली आणि अपमानाचा सामना मला यापुढे करावा लागणार आहे. पण, मी मात्र आहे त्या भूमिकेवर ठाम असेन. पुढच्या खडतर प्रवासाची ही तर फक्त सुरुवात आहे', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. सोबतच या प्रवासात आपली साथ देणाऱ्याचे त्यांनी आभारही मानले आहेत. 



प्रकाश राज २०१९ मधील लोकसभा निवणुकीत मध्य बंगळुरू मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून या रणसंग्रामात उतरले होते. मतमोजणी प्रक्रियेची सुरुवात झाल्यानंतर आपण पिछाडीवर असल्याचं लक्षात येताच प्रकाश राज यांनी मतमोजणी केंद्रावरुन काढता पाय घेतला होता. या मतदार संघात त्यांना काँग्रेसच्या रिझवान अर्शद आणि भाजपाच्या पीसी. मोहन यांचं आव्हान होतं. ज्यामध्ये भाजपच्या तिकिटावर उमेरदवारी मिळालेले पीसी. मोहन हे आघाडीवर असल्याचं चित्र होतं. मुख्य़ म्हणजे या मतदार संघात भाजपाचं पारडं २००९ आणि २०१४ अशा दोन्ही निवडणुकांमध्ये जड होतं. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याचं चित्र आहे.