Election results 2019 : अमेठीत मतदारांचं पारडं कुणाकडे झुकणार? अटीतटीची लढत
राहुल गांधी आणि स्मृती इराणी एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चं मतदान सात टप्प्यांत पार पडल्यानंतर आज लोतशाहीचा कल कुणाच्या बाजुनं आहे, त्याचा निकाल लागतोय. आज लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालांकडे अनेकांचे डोळे लागलेत. यामध्ये एक लढत अनेकांचं लक्ष वेधून घेतेय... ती म्हणजे अमेठी मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मृती इराणी आणि काँग्रेस उमेदवार राहुल गांधी यांच्यातील अटीतटीची लढत...
हाती आलेल्या सुरुवातीच्या कलानुसार, राहुल गांधी आणि स्मृती इराणी एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत. सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास राहुल गांधी स्मृती इराणी यांच्यापेक्षा ६००० मतांनी पिछाडीवर होते. परंतु, काही वेळानं त्यांनी आघाडी मिळवत स्मृती इराणी यांना पाठी टाकलं. ११ वाजल्याच्या सुमारास राहुल गांधी जवळपास ४३०० मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय.
उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तरप्रदेशच्या अमेठी मतदार संघाशिवय केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही लढत आहेत. राहुल गांधी वायनाडमध्ये मतांच्या मोठ्या फरकानं आघाडीवर आहेत. ते जवळपास १० हजार मतांनी आघाडीवर दिसत आहे. स्मृती इराणी यांनी २०१४ सालीही अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.