Loksabha Election Results 2024 : लोकशाहीशी हेळसांड कराल कर याद राखा; मतमोजणीवर दबाव टाकणाऱ्यांना जयराम रमेश यांचा इशारा
Loksabha Election Results 2024 : इंडिया आघाडीच्या बाजूनं सकारात्मक कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घराची वाट धरली...
Loksabha Election Results 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर निकालांचा दिवस उजाडला आणि पाहता पाहता 400 पार, ची हाक देणाऱ्या भाजपपुढची वाट बिकट असल्याचं पाहायला मिळालं. एकिकडून सत्ताधाऱ्यांना एकहाती झुंज देणाऱ्या इंडिया आघाडीच्या बाजूनं मतांचा कल दिसत असतानाच तिथं उत्तर प्रदेशानं देशातील निकालांना कलाटणी देण्याचं काम केल्याचं पाहायला मिळालं. पण, याच उत्तर प्रदेशातील गंभीर राजकीय परिस्थिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी X च्या माध्यमातून समोर आणली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रिया सुरु असतानाच रमेश यांनी पोस्ट लिहीत उत्तर प्रदेशातील महाराजगंज, बांसगांव, मेरठ, मुजफ्फरनगर या जागांसाठीची मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना जागांवर विजय दाखवण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याची खळबळजनक बाब समोर आणली. यावेळी प्रशासकिय अधिकाऱ्यांना ताकिद देत लोकशाहीशी कोणत्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नसल्याचा थेट इशारा त्यांनी दिला.
हेसुद्धा वाचा : Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: कमाल! राहुल गांधी दोन्ही मतदारसंघांतून मोठ्या मताधिक्यानं विजयी
राजस्थानातील काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीसुद्धा जयराम रमेश यांच्यासारखीच एक पोस्ट करत जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासनावर दबाव टाकण्यात येत होते ते पाहता अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान काँग्रेस नेत्यांकडून होणारे आरोप आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता निवडणूक आयोगानं या तक्रारींची दखल घेतली. मतमोजणी प्रक्रिया निर्धारित नियमांप्रमाणं होत असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं.