INDIA आघाडी की भाजपप्रणित NDA? देशात सरकार कुणाचं येणार? येत्या काही तासांत देशात मोठा राजकीय भूकंप
INDIA आघाडीने मोठ यश मिळवले आहे. यामुळे भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएला मोठा धक्का बसला आहे. INDIA आघाडी सरकार कुणाचं येणार? सत्ता परिवर्तन होणार की नेतृत्वबदल होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Election Results 2024 Live : लोकसभा निवडणुकीत देशभरात इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. इंडिया आघाडीच्या जागा वाढल्याने भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी एनडीएला 300 च्या आत रोखण्यात इंडिया आघाडीला यश मिळाल आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार नाही, असंच सध्याचं चित्र आहे. सत्ताधारी एनडीएला 292 च्या आसपास जागा मिळतील, असं दिसतंय.. याउलट इंडिया आघाडीनं तब्बल 234 जागांवर मजल मारली आहे. त्यामुळं सरकार कुणाचं येणार? सत्ता परिवर्तन होणार की नेतृत्वबदल होणार? याबाबतची उत्सूकला शिगेला पोहोचली आहे.
चारसो पारचा नारा देणा-या भाजपला मोठा धक्का
भाजपला निर्विवाद बहुमतानं हुलकावणी दिली आहे. चारसौ पारचा नारा देणा-या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. देशात NDA आणि इंडिया आघाडीमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली.. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून लगेचच पावलं उचलली जात आहेत. NDAच्या सर्व विजयी खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आल्याची सूत्रांची माहीती आहे. तसंच सत्तास्थापनेमध्ये किंगमेकर ठरणा-या चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमारांना भाजपकडून फोन करण्यात आले आहेत. नितिश कुमारांच्या जनता दल युनायटेडनं लोकसभेच्या 14 जागा जिंकल्या आहेत, तर चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पार्टनं 16 जागा काबीज केल्यात. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार घडामोडी
केंद्रात कोणाची सत्ता येणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे एनडीए तसंच इंडिया आघाडीमध्ये जोरदार घडामोडी घडताना दिसत आहेत. एनडीए तसंच इंडिया आघाडी या दोघांचीही उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावण्याय आलीय. सत्ता स्थापन करण्याबाबत या बैठकीत रणनीती ठरवली जाणार असल्याचं समजतंय. इंडिया आघाडीने सर्वच्या सर्व 28 पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण दिले. या बैठकीला उद्धव ठाकरेसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.. तर दुसरीकडे भाजपनेही एनडीएच्या सर्व नेत्यांना बैठकीचं निमंत्रण दिलं.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएच्या सर्व विजयी खासदारांना दिल्लीत बोलवण्यात आले आहे. एनडीएच्या खासदारांना उद्या सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NDA, TDP, JDU, HAM, LJP, RLD, JDS, जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झाली आहेत, उद्याच्या NDA बैठकीत सरकार स्थापनेची ब्लू प्रिंट तयार होईल. आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचे स्थान दिले जाईल, खुद्द पंतप्रधान सर्व पक्षांच्या प्रमुखांचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत.