Loksabha Election 2024 : सत्ता स्थापनेसाठी शरद पवार भाकरी फिरवणार? `तो` फोन कॉल चर्चेत
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Loksabha Election 2024 : देशातील लोकसभा निवडणुकांचे यंदाचे निकालाचे कल जाहीर होण्यास सुरुवात झाल्या क्षणापासूनच भाजपला हादरा देताना दिसले. जिथं भाजपनं प्रचारापासूनच '400 पार'च्या घोषणा दिल्या होत्या, तिथं एनडीए आघाडीन 300 जागांचा आकडा ओलांडतानाही गटांगळ्या खाताना दिसली. यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत समोर आली ती म्हणजे इंडिया आघाडी.
इंडिया आघाडीनं एनडीएला दिलेली कांटे की टक्कर पाहता आता चंद्राबाबू नायडू यांची टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला सोबत आणणण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इथं महत्त्वाची भूमिका सोपावण्यात आली ती म्हणजे, शरद पवार यांच्यावर.
हेसुद्धा वाचा : Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून उप पंतप्रधानपदाची ऑफर?
सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली असून, शरद पवारांचा नितीश कुमारांना फोन गेल्याचं म्हटलं जात आहे. सत्ता स्थापनेसाठीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतून नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीत आणण्याची जबाबदारी पवारांवर. इतकंच नव्हे, तर नितीश कुमार यांना उप पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याची माहितीसुद्धा सूत्रांनी दिल्यामुळं आता शरद पवार किंग मेकर ठरणार का, चंद्राबाबू नायडू पुन्हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान निकालांच्याच दिवशी कल आल्यानंतर आणि विजयी उमेदवार जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद काधत काही गोष्टी अधिकच स्पष्ट केल्या.
'उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळा निकाल दिला. यापूर्वी उत्तर प्रदेश आणि या भागात जे यश मिळायचं ते फार मोठं असायचं आता मिळालेला विजय कमी मताधिक्याने मिळाला आहे. याचा अर्थ आम्ही राष्ट्रीय पातळीवर जे काम करतो त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद आहे', असं ते म्हणाले.
हा निकाल परिवर्तनास पोषक असून, सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात वेगळा निकाल लागला. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची जबाबदारी घेतल्या कारणानं हे यश इंडिया आघाडीच्या वाट्याला आलं. येत्या काळात आमची धोरणं ठरवून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू असं सांगत इंडिया आघाडीची बैठक पार पडणार असल्याचं शरद पवार म्हणाले. दरम्यान आपला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा झाली नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं आता सूत्रांमार्फत मिळालेल्या या माहितीत कितपत तथ्य आहे हे येत्या काळात घडणाऱ्या घटनाच स्पष्ट करणार आहेत.