नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या सात वर्षात तीन पटींनी वाढली असल्याचं समोर येतंय. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदार संघातून अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर करण्यात आलेल्या आपल्या संपत्तीच्या माहितीवरून ही बाब समोर येतेय. अमित शहा यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केल्याचंही समजतंय. उमेदवारी अर्जाची तपासणी बारकाईने होत असल्यामुळे जर एक अर्ज रद्द झाला तर दुसऱ्या अर्जाचा फायदा होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांची एकूण चल-अचल संपत्ती ३८.८१ कोटी इतकी दाखवली गेलीय. २०१२ साली ही संपत्ती ११.७९ कोटी होती. त्यामुळे गेल्या सात वर्षात ही संपत्ती तीन पटीने वाढली आहे. यात त्यांना वारसा हक्काने २३.४५ कोटी संपत्ती मिळाली असल्याचं नमूद करण्यात आलं. 
 
मात्र, अमित शाह यांच्याकडे स्वत:च्या मालकीची एकही कार नसल्याचं यात म्हटलं गेलंय. उल्लेखनीय म्हणजे, भाजप अध्यक्ष शाह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची वार्षिक कमाई ५३ लाख रुपये आहे. शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांच्या नावावर ४.३६ करोडोंची संपत्ती आहे. २०१७ मध्ये त्यांच्याकडे ३.८८ कोटींची संपत्ती होती. त्यांच्याकडे एकूण २३.५५ कोटींचे दागिने आहेत. 


२०१७ मध्ये राज्यसभेसाठी नामांकन दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात शाह यांनी आपली संपत्ती ३४.३१ करोड रुपये असल्याचं सांगितलं होतं. २०१७ पासूनही शाह यांच्या संपत्तीत एकूण ४.५ करोड रुपयांची वाढ झालीय.