Loksabha Election 2019 : पहिल्या यादीसाठी भाजपाची `रात्रीस बैठक चाले`!
`या` उमेदवारांना मिळू शकतं तिकीट, सूत्रांची माहिती
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, आता मोठ्या पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर करण्याचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेसकडून आगामी निवडणुकांसाठीची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर, भाजपातही यासंबंधीच्या हालचालींना वेग आला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नवी दिल्ली येथे भाजपातील मोठ्या नेत्यांची बैठक पार पार पडली. या बैठकीनंतर रविवारी पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्यरात्र उलटून गेल्यानंतर जवळपास दोन वाजेपर्यंत पार पडलेल्या या बैठकीत अकरा राज्यांमधील मतदार संघांविषयीचे महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि किरेन रिजीजू यांची बैठकीला उपस्थिती होती. दरम्यान, या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील ८० जागांविषयी या बैठकीत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. यासाठीची बैठक रविवारी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्याची चिन्हं आहेत. शिवाय यंदाच्या निवडणुकांमध्ये पाटणा साहिब भागातून यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्याऐवजी पक्षाकडून रविशंकर प्रसाद यांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. तर, बिहारच्या भागलपूरसाठीची जागा जदयूला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम या राज्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्यासाठी भाजपाच्या पहिल्या यादीत १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असल्याची बाब समोर येत आहे. या यादीत २०१४ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांपैकी जवळपास पाच ते सहा जणांचे तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चाही आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची संभाव्य यादी खालीलप्रमाणे
पाटणा साहिब- रविशंकर प्रसाद
पूर्व चंपारण (बिहार)- राधामोहन सिंह
नागपूर (महाराष्ट्र)- नितीन गडकरी
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन
उत्तर पूर्व मुंबई- किरीट सोमय्या
सारण (बिहार)- राजीव प्रताप रूडी
बक्सर (बिहार)- अश्विनी चौबे
बेगूसराय (बिहार)- गिरीराज सिंह
गाजीपूर (उत्तर प्रदेश)- मनोज सिन्हा
चंदौली (उत्तर प्रदेश)- महेंद्रनाथ पांडे
अमेठी (उत्तर प्रदेश)- स्मृती इराणी
हमीरपूर (हिमाचल प्रदेश)- अनुराग ठाकूर
हजारीबाग (झारखंड)- जयंत सिन्हा
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)- नरेंद्र सिंह तोमर
चंद्रपूर (महाराष्ट्र)- हंसराज अहिर