Loksabha Election 2019 : अयोध्येत पोस्टरबाजी; `राम भक्त` म्हणून होतोय प्रियंका गांधींचा उल्लेख
अनेक ठिकाणी लागले पोस्टर
अयोध्या : लोकसभा निवडणुकांच्या आधी मतदारांची भेट घेऊन प्रचार करण्याला प्राधान्य देणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आता अयोध्येला भेट देणार आहेत. त्यांच्या अयोध्य़ा भेटीच्या निमित्ताने त्या ठिकाणी सर्वत्र प्रियंका आणि राहुल गांधींचे पोस्टर अर्थात फलक लावण्यात आले आहेत. राजकीय नेतेमंडळींचे फलक लागणं हे काही नवं नाही. पण, अयोध्येत लावण्यात आलेल्या या मोठ्या फलकांवर 'राम भक्त' असा प्रियंकांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ही पोस्टरबाजी सध्या राजकीय वर्तुळासोबतच सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
अयोध्येत अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या या फलकांमध्ये रामाची प्रतिमा असणारं छायाचित्र हे फलकाच्या मध्यभागी असून त्याच्या एका बाजूला प्रियंका गांधी वाड्रा आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे दोन्ही हात जो़डून नतमस्तक झाल्याची छायाचित्र लावण्यात आली आहेत. त्यामुळे एका अर्थी राम मंदिर आणि राम भक्तीचा मुद्दा प्रचाराच्या निमित्ताने विविध मार्गांनी वापरला जात असल्याचच स्पष्ट होत आहे.
२०१८ मध्ये मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेही असे फलक पाहायला मिळाले होते. ज्यामध्ये त्यांचा उल्लेख 'शिव भक्त' असा करण्यात आला होता. शंकराचे भक्त असल्याचं भासवणारे राहुल यांचे अनेक फलक मध्यप्रदेशमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामुळे तेव्हाची शिवभक्ती आणि आताची रामभक्ती कांग्रेसला फळणार का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
२७ मार्चपासून प्रियंका गांधी अयोध्येत त्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. जावेनारी महिन्यापासून सक्रिय राजकारणात प्रवेश केलेल्या प्रियंका गांधी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध मतदार संघांमध्ये भेट देत पक्षाच्या प्रचारासाठी मतदारांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वीत त्यांनी वाराणासी आणि प्रयागराज येथे भेट दिली होती.
दरम्यान, प्रियंका यांत्या वाराणासी दौऱ्याप्रमाणेच अयोध्या दौऱ्यावरही विरोधकांनी टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. 'रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित करणारे अयोध्येत नेमकं काय शोधण्यासाठी येत आहेत?', असा प्रश्न उत्तर प्रदेशच्या मंत्रीमंडळातील मोहसीन रजा यांनी उपस्थित केला. प्रयागराजमधील कुंभ मेळा, अयोध्येतील दीपोत्सवाला त्यांची उपस्थिती नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत त्यांना मुघल शासक बाबरच्या काही गोष्टी स्मरणात असून, त्याच्याशीच निगडीत काही गोष्टींच्या शोधात त्या येत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. गांधी या सायबेरियन पक्षी असून, हवामानाचा अंदाज घेण्यासाठी या पक्ष्यांप्रमाणेत त्या एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होत असल्याची टीका रजा यांनी केली. आरोप-प्रत्यारोपांच्या या सत्रात प्रियंका गांधी यांनी मात्र आपला प्रचार दौरा कायम ठेवला आहे.