नवी दिल्ली : राजकारणात प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेस सरचिटणीसपद प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेश (पूर्व) ची जबाबदारी देण्यात आली. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांची मोठबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेश हे राज्य काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणले असून, त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मॅरेथॉन बैठक घेण्यास सुरूवातही केली आहे. तिकिट देण्यात येणाऱ्या उमेदवारांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासोबतच व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर देखील त्या सक्रिय दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रियांका गांधी यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आहे. 'चौपाल' असे या ग्रुपचे नाव आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने बूथवर 10-10    कार्यकर्तांनी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप तर दुसरीकडे सप-बसप या दोन्ही पक्षांची आघाडी समोर असताना काँग्रेसला आपले स्थान मजबूत करणे आणि जागा जिंकणे यावर मेहनत घ्यावी लागणार आहे. 



'चौपाल' मॉडेल याआधी अमेठी आणि रायबरेलीच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी करण्यात आले होते. उत्तर प्रदेश (पू्र्व) ची जबाबदारी संभाळणाऱ्या प्रियांका यांनी पुन्हा 'चौपाल' ने कार्यकर्त्यांना जोडण्यास सुरूवात केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून प्रियांका कार्यकर्त्यांकडून ग्राऊंड रिपोर्ट घेत आहेत. प्रियांका यांना भेटायला आलेल्या कार्यकर्ता आमि तिकिटांसाठी दावेदार असलेल्यांकडून फॉर्म भरवून घेतला जात आहे. या अंतर्गत प्रियांका त्यांची जात, उपजात, सोशल मीडिया अकाऊंट याची माहिती घेत आहेत. यासोबतच आधी झालेल्या निवडणूकांमधील निकालाची माहिती घेण्यात आली आहे. 


प्रियांका यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. कार्यकर्त्यांची बाजू समजावून घेत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाची ओळख त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मजबूतीने लोकांमध्ये जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.