गांधीनगर : देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असून जनतेने जागरूक राहण्याची गरज असल्याचे वक्तव्य कॉंग्रेस महासिचव प्रियांका गांधी यांनी केले आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. दरम्यान काँग्रेस पार्टीच्या लोकसभा निवडणुक 2019 च्या कॅम्पेनिंगला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पार्टीने आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये वर्किंग कमिटीची महत्त्वाची बैठक घेतली. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्मृति भवनात झालेल्या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहित पार्टीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमची जागृकता एक हत्यार आहे. तुमचं मत हे एक हत्यार आहे. हे एक असे हत्यार आहे ज्याने कोणाला दु:ख पोहोचणार नाही. कोणालाही इजा पोहोचणार नाही. याचा वापर तुम्ही करायला हवा असे प्रियांका यावेळी म्हणाल्या. 



तरुणांना रोजगार कसे मिळेल, महागाई कशी कमी होईल असेल हे निवडणुकीचे मुद्दे आहेत. 15 लाख येणार होते ते कुठे गेले. महिलांच्या संरक्षणाचे काय झाले हे प्रश्न त्यांना विचारा, असे म्हणत त्यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला. मतदानातून तुमची देशभक्ती दिसायला हवी असे आवाहन त्यांनी जनतेला केले. ज्या ठिकाणाहून गांधींनी अहिंसेचा, देशभक्तीचा नारा दिला होता तिथूनच तुम्हीपण आवाज उठवायला सुरूवात केली पाहिजे.



हा देश तुमचा आहे. हा देश माझ्या शेतकरी बांधवांनी, तरुणांनी, महिलांनी बनवला आहे. यावर तुमचाच हक्क आहे. जिथे पाहाल तिथे द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे तुम्हाला मतदानातून याला उत्तर द्यायचे असल्याचे आवाहन प्रियांका गांधी यांनी यावेळी केले.