भाजपाला यावेळेस 210 जागा मिळतील, सरकार एनडीएचे असेल- संजय राऊत
पुढचे सरकार हे `एनडीए`चे असेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : 2014 मध्ये 'भाजपा'चे सरकार होते आणि पुढचे सरकार हे 'एनडीए'चे असेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राजकीय परिस्थितीचा अंदाज 2014 ला व्यक्त केला होता आणि आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा निकालही सांगता येऊ शकतो असेही ते म्हणाले. भाजपाला आगामी निवडणुकीत 210 जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केली आहे. एनडीएला साधारण 300 जागा मिळतील असेही ते म्हणाले. यावेळच्या निवडणुका सात फेऱ्यांमध्ये होणार आहेत. 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत हे मतदान होणार आहे. तर 23 मेला निकाल लागणार आहे.
आता भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. पण भाजपाला 200 हून कमी जागा मिळाल्या तर पुढचे पंतप्रधान निवडण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील असेही त्यांनी म्हटले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या. 1984 लोकसभा निवडणुकी नंतर कोणत्याही पक्षाला मिळालेल्या या सर्वाधिक जागा आहेत. 2014 मधील देशाची अवस्था आणि 2019 मधील स्थितीमध्ये मोठा फरक आहे. 2014 मध्ये 'भाजपा'चे सरकार बनले होते पण आता 2019 मध्ये 'एनडीए'चे सरकार असेल असेही ते म्हणाले.
भाजपाला 210 तर एनडीएला 300 जागा मिळतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर राजकारणाचा अर्थ बदलला आहे. लोकांना केंद्रामध्ये स्थिर सरकार हवे आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये तूतूमैमै असताना झालेल्या युतीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राष्ट्रहितासाठी आम्ही एकत्र आल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आक्रमकपणा सोडल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सर्वांनी विनम्र असावे असे राऊत म्हणाले. तुम्हाला लोकांसमोर झुकावेच लागेल. जनतेचा म्होरक्या कोणी होऊ शकत नाही. ना नेहरू तसे होऊ शकले ना इंग्रज, ना मुघल असे बनले. तुम्हाला विनम्र बनावेच लागेल असे उत्तर संजय राऊत यांनी दिले.