ममता बॅनर्जींना मोठा धक्का, ४ वेळा आमदार असलेले अर्जुन सिंह भाजपमध्ये
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना भाजपने आणखी एक धक्का दिला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. तृणमुल काँग्रेसचे आमदार अर्जुन सिंह यांना आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाटपाडा येथून ते आमदार म्हणून निवडून गेले आहेत. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसब भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि टीएमसीमधून याआधीच भाजपमध्ये आलेले मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसला गळती सुरु झाली आहे. लागोपाठ ४ वेळा निवडून आलेले अर्जुन सिंह यांचा भाजप प्रवेश हा ममता बॅनर्जींसाठी मोठा झटका मानला जात आहे.
भाजप पश्चिम बंगालमध्ये मुख्य विरोधी पक्ष बनण्यासाठी मेहनत करत आहे. पक्षाला आशा आहे की, २०१४ च्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये त्यांना चांगलं यश मिळेल. मंगळवारी टीएमसीचे खासदार अनुपम हाजरा यांच्यासह काँग्रेसचे आमदार दुलाल चंद्र आणि डाव्या पक्षाचे नेते आमदार खगेन मुर्मू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपने २०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये २ जागा जिंकल्या होत्या. आगामी काळात आणखी काही नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. रविवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. तृणमुल काँग्रेसला यंदा भाजप चांगलीच टक्कर देताना दिसणार आहे.