भाजपचं `घर वापसी` अभियान? एनडीएतील जुन्या मित्रांना पुन्हा सोबत घेणार?
2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपनं बेरजेचं राजकारण सुरू करायचं ठरवलंय, यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
Maharashtra Politics : जेमतेम एक वर्ष उरल्यानं आतापासूनच लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) ढोलताशे वाजू लागले आहेत. भाजपच्या (BJP) विरोधात काँग्रेसनं (Congress) विरोधकांची मोट बांधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत. तर दुसरीकडं सत्ताधारी भाजपनं देखील बेरजेचं राजकारण सुरू केलंय. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकण्याची हॅटट्रिक करण्यासाठी एनडीएमधील (NDA) जुन्या मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपनं सुरू केल्यात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय...
मित्रपक्षांसाठी 'घर वापसी' अभियान?
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात भाजप-टीडीपी युती होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 2018 मध्ये भाजप आणि तेलगू देसम पार्टीची युती तुटली होती मात्र टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंनी अलिकडेच दिल्लीत अमित शाह आणि जे. पी. नड्डांची भेट घेतली. उत्तर प्रदेशात ओमप्रकाश राजभर यांच्या सुभासपा पक्षाला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. राजभर यांना पुन्हा एनडीएत आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि परिवहनमंत्री दयाशंकर सिंह यांच्यावर सोपवण्यात आलीय.
बिहारमध्ये चिराग पासवान यांच्यासोबत भाजपची जवळीक वाढलीय. मात्र सध्या एनडीएत असलेले काका पशुपती पारस नव्या मैत्रीत अडथळा ठरतायत. काका-पुतण्यांना सोबत घेण्यासाठी भाजपचे चाणक्य कामाला लागल्याचं समजतंय. जेडीयूत वेगळे झालेले उपेंद्र कुशवाहा आणि जीतनराम मांझी यांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून भाजप-शिरोमणी अकाली दल युती तुटली. त्याचा फटका पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन्ही राजकीय पक्षांना बसला. त्यामुळंच पुन्हा एकदा अकाली दलाला सोबत घेण्याची भाजपची तयारी सुरू झालीय.
राज्यात शिंदे-भाजप एकत्र
आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. शिंदे फडणवीसांची बैठक अमित शाहांसोबत झाली. आगामी लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढवणार असल्याचा निर्णय शाहांसोबतच्या दिल्लीतील बैठकीत झाला. पण लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्हाला हलक्यात घेऊ नका असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाला दिलाय. धाराशिवची लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार असंही सावंतांनी ठासून सांगितलंय.
दुधानं तोंड पोळल्यानंतर ताकही फुंकून फुंकून पितो. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीसाठी कोणताही राजकीय धोका पत्करण्याची भाजपची इच्छा नाही. त्यामुळंच जुन्या मित्रपक्षांना सोबत घेऊन विरोधकांचा हल्ला परतवून लावण्याची प्रतियोजना भाजप धुरिणांनी आखल्याचं समजतंय. भाजपच्या या प्रयत्नांना किती यश येतं, ते पाहायचं.