Loksabha Election : कंगना रणौतला उमेदवारी; भाजपच्या 5 व्या उमेदवार यादीत मोठा उलटफेर
Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे.
Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पाचवी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. कंगनाला उमेदवारी मिळणार ही बाब अनेकांसाठीच अपेक्षित होती. पण, संभाव्य चर्चांशिवाय तिला थेट लोकसभा निवडणुकीसाठी मिळालेलं तिकीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपच्या वतीनं आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या उमेदवार यादीमध्ये एकूण 111 उमेदवारांची नावं असून, त्यात कंगनाच्य़ाही नावाचाही समावेश आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपची ही उमेदवार यादी म्हणजे एक मोठा उलटफेर ठरत असून, त्यात वरुण गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांची नावं वगळण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ढगाळ वातावरणातही उकाडा अटळ ; कुठे पाहायला मिळणार उन्हाळ्याचं रौद्र रुप?
कोणकोणत्या दिग्गजांची नावं यादीतून वगळली?
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वी के सिंह यांच्या जागी गाजियाबादमधून स्थानिक नेते अतुल गर्ग यांना संधी देण्यात आली आहे. तर, बिहारच्या बक्सर येथून केंद्रीय मंत्री अतूल चौबे यांना वगळून त्या जागेवर मिथिलेश तिवारी यांना तिकीट दिलं आहे. पीलीभीत येथून वरुण गांधी या मोठ्या नावाला बगल देत भाजपनं राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या नावे उमेदवारी बहाल केली आहे. तर, मनेका गांधी यांना पुन्हा एकदा सुलतानपूर येथून निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. आहे.
महाराष्ट्रातून कोणाला संधी ?
फक्त कंगना रणौतच नव्हे, तर, मेरठमधून भाजपनं अभिनेते अरुण गोविल यांनाही उमेदवारी दिली आहे. दरम्यान, जिथं भाजपकडून दिग्गजांना वगळत पाचवी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली तिथं पक्षाकडून भंडारा- गोंदिया मतदार संघातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा संधी दिली. शिवाय अशोक नेते यांनाही संधी मिळाली असून ते मागील 10 वर्षे गडचिरोली येथून खासदार राहिले आहेत. तर, मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.