कंगनाच्या बोल्ड फोटोला काँग्रेस नेत्याची अश्लील कॅप्शन; अभिनेत्री म्हणाली, `वेश्याव्यवसाय..`
Loksabha Election 2024 Kangana Ranaut Viral Post: अभिनेत्री कंगनाला रणौतला भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटलं असून या प्रकरणामध्ये महिला आयोगाने स्वत: लक्ष घालत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
Loksabha Election 2024 Kangana Ranaut Viral Post: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली आहे. कंगनाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वेगळ्याच विषयावरुन वाद सुरु झाला असून हा वाद थेट महिला आयोगापर्यंत पोहचला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी कंगना आणि भाजपावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. मात्र या टिका टिप्पणीदरम्यान काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन कंगनाचा एक वादग्रस्त फोटो पोस्ट करण्यात आला. सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टा हा फोटो पोस्ट करण्यात आल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं. या पोस्टचा स्क्रीनशॉट कंगनाने पोस्ट करत त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्यावर सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ जारी केला. मात्र आता या प्रकरणात थेट महिला आयोगाने दाखल घेतली आहे.
नक्की घडलं काय?
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौतला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना राणौत यांचा एक बोल्ड फोटो पोस्ट केला होता. या फोटो शेअर करताना त्याला वादग्रस्त कॅप्शनही देण्यात आली होती. मंडीमध्ये काय भाव सुरु आहे? अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली होती. एका महिला नेत्यानेच महिला उमेदवारासंदर्भात अश्लील शब्दांमध्ये भाष्य केल्याने भाजपाने संताप व्यक्त केला होता. यावर थेट कंगनाही सोशल मीडियावर व्यक्त झाली.
कंगनाने नोंदवली प्रतिक्रिया
सुप्रिया श्रीनेत यांच्या अकाऊंटवरील या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगाने आपली प्रतिक्रिया नोंदवली. "कलाकार म्हणून मी गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका साकारल्या आहेत. 'राणी'मधील एका भोळ्या मुलीपासून ते 'धाकड'मधील मोहक नावाच्या गुप्तहेरापर्यंत आणि 'मणिकर्णिका'मधील 'देवी'पासून 'चंद्रमुखी'तील 'राक्षसा'पर्यंत, 'रज्जो'मधील 'वेश्ये'पासून 'थलाईवी'तील क्रांतिकारी नेत्यापर्यंत अनेक भूमिका मी साकारल्या. आपणच आपल्या (देशातील) लेकांनी पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त करायला हवं. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचा अशाप्रकारे अपमान करणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक स्त्री ही सन्मानास पात्र आहे," अशा प्रदीर्घ कॅप्शनसहीत कंगनाने सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला.
सुप्रिया श्रीनेत यांचं स्पष्टीकरण
हे प्रकरण तापल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्टीकरण दिलं. "माझ्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटचा गैरवापर करून एका व्यक्तीने अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट केली. ही पोस्ट आता माझ्या अकाऊंटवरुन काढून टाकण्यात आली आहे. जे मला ओळखतात त्यांना ठाऊक आहे की मी स्त्रियांबाबत असं कधीच बोलणार नाही. माझ्या नावाचा गैरवापर करणारे पॅरेडी अकाऊंटही सुरू आहे. या माध्यमातून यापूर्वीही अनेकदा वागद्रस्त विधानं आणि टीप्पण्या करण्यात आल्या आहेत. मी यासंदर्भात ट्विटरकडे तक्रार नोंदवली आहे. याच खात्यावर करण्यात आलेली पोस्ट माझ्या टीममधील कोणत्या व्यक्तीने कॉपी पेस्ट करुन माझ्या खात्यावरुन शेअर केली. मी कधीही कोणत्याही महिलेबद्दल असं विधान करणार नाही," असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं आहे.
थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार
सुप्रिया यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली असली तरी थेट निवडणूक आयोगापर्यंत हे प्रकरण पोहचलं आहे. महिला आयोगाने स्वत: या प्रकरणाची दखल घेतली आहे. सदर प्रकरणासंदर्भातील तक्रार महिला आयोगाने थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी असं महिला आयोगाने म्हटलं आहे.