`तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध...`; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज
Loksabha Election 2024: पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या मध्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या पारर्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण आताच तापू लागलं आहे.
Loksabha Election 2024: पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे नेते अग्निमित्रा पॉल यांनी राज्याच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध ममता बॅनर्जींनी निवडणूक लढवून दाखवावी, असं पॉल यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये वाराणीसमधून संभाव्य उमेदवार म्हणून इंडिया आघाडीकडून प्रियंका गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीवरच प्रतिक्रिया देताना पॉल यांनी थेट ममतांना आव्हान दिलं आहे.
सीएम विरुद्ध पीएम
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पॉल यांनी, "प्रियंका गांधींऐवजी लढण्याची हिंमत असेल तर ममता बॅनर्जींनी जागा वाटप होण्याआधी याचा विचार करावा. तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे ना? आपल्या मुख्यमंत्री पंतप्रधानांना टक्कर देतील. पाहूयात त्यांच्यामध्ये किती हिंमत आहे," असं म्हटलं.
यापूर्वीही झालेली चर्चा
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान मोदींविरोधात वाराणीसच्या जागेवर प्रियंका गांधींना उमेदवारी मिळण्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र या अत्यंत महत्त्वाच्या जागेवरुन काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिल्याने या चर्चेवर पडदा पडला. इंडिया आघाडीच्या दिल्लीमधील बैठकीमध्ये बॅनर्जी यांनी खरोखरच प्रियंका गांधींचं नाव सुचवलं होतं का याबद्दल त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना, "जी काही चर्चा झाली त्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही," असं ममता म्हणाल्या.
जागा वाटप निश्चित करण्याची मागणी
इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये तृणमूलच्या प्रमुख नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आघाडीतील घटक पक्षांना 31 डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करावा असा आग्रह केला. तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राज्य स्तरावर जागा वाटप कशी केली जावी याबद्दल 31 डिसेंबरपर्यंत अगदी प्राथमिक यादी तयार करण्यास सर्वांनी सहमती दर्शवली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये याचा अंतिम स्वरुप देण्याचं काम सुरु होईल अशी शक्यता तृणमूलच्या सूत्रांनी व्यक्त केली.
अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये 'इंडिया' आघाडीची बैठक 19 डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे नेते तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, ममता बॅनर्जी, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्यासहीत इतर अनेक नेते उपस्थित होते.