LokSabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. निवडणुकीत नेमका काय निकाल लागेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भाजपाने 400 जागांचा टप्पा पार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यादरम्यान भाजपाच्या खात्यात पहिल्या विजयाची नोंद झाली आहे. याचं कारण भाजपाचे सूरतमधील लोकसभा उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सर्व उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडून येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. आपले अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिले कमळ अर्पण केले आहे. सूरत लोकसभा मतदारसंघातील आमचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो," अशी पोस्ट चंद्रकांत पाटील यांनी एक्सवर शेअर केली आहे. 



सूरतमध्ये एकूण आठ उमेदवार होते. त्यापैकी सात अपक्ष आणि आणि बहुजन समाज पक्षाचे (BSP) प्यारेलाल भारती यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. जिल्हा रिटर्निंग ऑफिसर सौरभ पारघी यांना प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. 


सुरतमधून काँग्रेसने पर्यायी उमेदवार म्हणून सुरेश पडसाळ यांनाही उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलं होतं. पण त्यांचा उमेदवारी अर्जही अवैध ठरला. काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी दाखल केलेले चार उमेदवारी अर्ज योग्य नसल्याचे रिटर्निंग ऑफिसरने सांगितलं होतं. प्रस्तावकांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की त्यांनी स्वतः फॉर्मवर स्वाक्षरी केली नाही, असं रिटर्निंग ऑफिसरने आदेशात म्हटले आहे.


काँग्रेसचे वकील बाबू मांगुकिया यांनी पक्ष हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, सूरतमधील घडामोडी 'लोकशाही धोक्यात आहे' असे सूचित करतात. 


"आमच्या निवडणुका, आमची लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना - सर्व पिढ्यानपिढ्या धोक्यात आहेत. ही आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे," असं जयराम रमेश म्हणाले.