Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?
Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे.
Loksabha Election: काँग्रेसने (Congress) आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 46 उमेदरावाराची चौथी उमेदवारी जाहिर केली आहे. यावेळी काँग्रेसने वाराणसी मतदारसंघातील उमेदवारही घोषित केला आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेसने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अजय राय 2014 आणि 2019च्या लोकसभेतही वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढले होते. मात्र, दोन्हीही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांचा 4.80 लाख मतांनी पराभव केला होता. तर, अजय राय यांना 1 लाख 52 हजार 548 मते मिळाली होती व ते तिसऱ्या स्थानी होते. मागील लोकसभेत वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींना 63.62 टक्के मते मिळाली होती तर अजय राय यांना 14.38 टक्के मते मिळाली होती.
2014च्या लोकसभा निवडणुकीतही अजय राय पंतप्रधान मोदींविरोधात लढले होते. तेव्हाही त्यांचा पराभव झाला होता तर ते दुसऱ्या स्थानी होते. त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुक अटी-तटीची होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसने 543 लोकसभा जागांसाठी आत्तापर्यंत 185 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. चौथ्या यादीत काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांना तिकिट देण्यात आलं आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना राजगढमधून उमेदवारी दिली आहे. अरुण श्रीवास्तव यांना भोपाळमधून तर, नितीन गडकरी यांच्या विरोधात पक्षाने विकास ठाकरे यांना नागपुरातून उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणुक 2019मध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या 80 लोकसभा जागांमधून फक्त रायबरेलीच्या जागेवर विजय मिळवला होता. येथून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उमेदवार होत्या.
विदर्भातील 4 उमेदवार जाहिर
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या पाचपैकी चार मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे. नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, काँग्रेसने चंद्रपूर मतदारसंघातील नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान असतानादेखील काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहिर केलेला नाहीये.