Savitri Jindal Networth: लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. लोकसभेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तसा काँग्रेसला एकामागोमाग धक्के बसत आहेत. आता देशातील सर्वात श्रीमंत महिला आणि टॉप श्रीमंताच्या यादीत नाव असलेल्या सावित्री जिंदल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याची घोषणा केली आहे. ओपी जिंदल समुहाच्या चेअरमन आणि हरियाणाच्या माजी मंत्री सावित्री जिंदल यांनी बुधवारी रात्री ही घोषणा केली आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. त्यांची एकूण नेटवर्थ किती आहे, जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावित्री जिंदाल यांनी बुधवारी ट्विटर (X)वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी आमदार म्हणून 10 वर्षांपर्यंत हिसारच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व केले आणि एक मंत्री म्हणून निस्वार्थपणे हरियाणा राज्याची सेवा केली. हिसारची जनता माझे कुटुंब आहे. कुटुंबाच्या सल्ल्याने मी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्वाने दिलेल्या समर्थनासाठी आणि सहकाऱ्यांची नेहमीच आभारी राहिल. त्यांनी मला नेहमी समर्थन व सन्मान दिले, असं जिंदाल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


2 लाख कोटींहून अधिक नेटवर्थ 


भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदल यांचे नाव येते. त्यांचे वय 84 आहे आणि या वयातही ते व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, 28 मार्च 2024पर्यंत सावित्री जिंदाल यांची संपत्ती 29.6 अरब डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांनुसार, 2.47 कोटी रुपयांच्या आसपास त्यांची संपत्ती आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री यांचे नाव सर्वात पहिले येते. तर, जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचे नाव 56व्या स्थानी आहे.


सावित्री जिंदाल यांची राजकीय कारकिर्दी


ओपी जिंदल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदल यांनी तब्बल 10 वर्षांपर्यंत हिसार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि हरियाणा सरकारमध्ये मंत्री म्हणूनही कामकाज पाहिले. 2005मध्ये एका विमान अपघातात त्यांचे पती आणि जिंदल समूहाचे संस्थापक ओपी जिंदल यांचा मृत्यू झाला होता. जिंदल यांच्या मृत्यूनंतर हिसार मतदारसंघातून सावित्री जिंदल यांना हरियाणा विधानसभेसाठी निवडण्यात आले. 2009 मध्ये पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली. तसंच, ऑक्टोबर 2013मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र 2014मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांना हिसारमधून पराभव पत्करावा लागला होता.