Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वी भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबर अनेक प्रादेशिक पक्षही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आता काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 39 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद त्यांनी लोकसभेसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भूपेश बघेल हे राजनांदगावमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. 


काँग्रेसच्या उमेदवारांची यादी



काँग्रेसकडून कोणाकोणाला तिकीट?


काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीत प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा या लोकसभा जागांचा समावेश आहे. यात राहुल गांधी हे वायनाड या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर शशी थरुर हे तिरुवनंतपुरममधून लोकसभा निवडणूक लढवतील. तर छत्तीसगडमधील राजनांदगाव या लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजेंद्र साहू यांना दुर्ग, ज्योत्सना महंत यांना कोरबा आणि शिवकुमार देहरिया यांना जांजगीर-चंपा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांचादेखील समावेश आहे. ते केरळमधील अलापुझ्झा या जागेवरुन निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेश यांनादेखील काँग्रेसने पहिल्याच यादीत तिकीट दिले आहे. ते बंगळुरू ग्रामीण या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.



दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा जागांवर चर्चा झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीप या लोकसभा जागांचा समावेश आहे. त्यापैकी 39 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित जागांसाठी उमेदवारांच्या नावाबद्दल सध्या चर्चा सुरु असून लवकरच ही नावे जाहीर केली जातील. येत्या काही दिवसांत पक्षाकडून लवकरच दुसरी यादी जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे.