Parliament Attack Lok Sabha Security Breach: देशाला हादरवणारी आजची सर्वात मोठी बातमी. संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी आज लोकसभेत प्रवेश केला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी कामकाज सुरु असताना उडी मारली.. त्यामुळे लोकसभेच्या कामकाजावेळी एकच गोंधळ उडाला. कामकाज सुरु असताना हे दोन्ही अज्ञात अचानक घुसले. आरोपींच्या बुटात गॅस पाईपसारखी वस्तू होती. मात्र खासदारांनी दोन्ही तरुणांना घेरलं आणि  सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब या दोघांना ताब्यात घेतलं. हे  दोघेही खासदारांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर (Loksabha Visitor Pass) आले होते.  म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावे पास तयार केले होते अशी माहिती समजतेय. मात्र या सर्व प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेवर (Parliament Security) मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष म्हणजे आजच संसदेवर झालेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली. त्याच दिवशी लोकसभेची सुरक्षा भेदली जाणं ही घटना धक्कादायक मानली जातेय. खासदारांनीही या घटनेनंतर सुरक्षेवर चिंता व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र कनेक्शन
याप्रकरणी अटक करण्यात आलेला अमोल धनराज शिंदे (Amol Dhanraj Shinde) हा तरुण महाराष्ट्रातला आहे. अमोल मूळचा लातूरच्या (Latur) चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा राहणारा आहे.  संसदेत दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत उडी मारली. तर दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शनं केली. स्मोक कँडलमधून त्यांनी धूर सोडला. त्यामध्ये अमोलचा समावेश होता. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी अमोल शिंदेला तत्काळ अटक केली. लोकसभेतील घुसखोरीप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना फोन करून महाराष्ट्रातील युवकासंदर्भात तातडीने माहिती घेण्यास सांगितलंय. तर संसदभवनाबाहेर अटक करण्यात आलेल्या तरूणीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तानाशाही नही चलेगी अशी घोषणा ही तरूणी देत होती. हिस्सारच्या या तरूणीचं नाव नीलम सिंह असं आहे. 


दिल्ली पोलिसांकडून चौकशी
लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी केलेल्या दोन्ही तरुणांची आता दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक या दोघांची चौकशी करेल. दहशतवाद विरोधी पथक संसदेत दाखल झालंय. लोकसभेत घुसखोरी केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. त्या दोन्ही तरुणांची चौकशी दिल्ली पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक करेल..


पंतप्रधान-गृहमंत्री संसदेत नव्हते
लोकसभेत हा गोंधळ झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. 13 डिसेंबरला संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी गेले. 


स्मोक कँडल म्हणजे काय?
स्मोक कँडल म्हणजे एक प्रकारचा फटाका आहे. ज्याचा वापर मिरवणूक किंवा उत्सवाच्यावेळी केला जातो. आपातकालीन परिस्थितीत सिग्नल देण्यासाठीही स्मोक कँडलचा वापर केला जातो. वेगवेगळ्या रंगाचे या स्मोक कॅडल असतात दूरुनही याचा धूर दिसतो. स्मोक कँडल विषारी नसते, पण याचा त्रास होऊ शकतो. स्मोक कँडल दिसायला एखाद्या हँड ग्रेनेडसारखी दिसते. बाजारात याची किंमत 500 ते 2000 रुपयांपर्यंत आहे. संसदेत आरोपींनी वापरलेल्या स्मोक कँडलमधून पिवळ्या रंगाचा धूर निघत होता. नेवी आणि आर्मीत सिग्नल देण्यासाठीही स्मोक कँडलचा वापर केला जातो. अँडव्हेचरला जाणारेही एकमेकांना इशारा देण्यासाठी स्मोक कँडलचा वापर होतो.