नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते शशी थरूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राणी पद्मावतीबाबत थरूर यांनी केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद संपतो न संपतो तोच, थरूर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले. या वेळी त्यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून निशाणा साधताना मिस वर्ल्ड 2017चा किताब जिंकलेल्या मानुषी छिल्लरची नावावरून खिल्ली उडवली.


थरूर स्वत:च झाले ट्रोल.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थरूर यांनी मानुषीच्या 'छिल्लर' या आडणावावरून खिल्ली उडवत ट्विट केले आहे. थरूर यांनी छिल्लर हे आडनावर नोटबंदीच्या मुद्द्याशी जोडत आमची चिल्लरही मिस वर्ल्ड बनली. त्यांनी मानुषीच्या नावाच्या आधारे मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नोटबंदीवर जोरदार निशाणा साधला. मात्र, थरूर यांच्या या निशाणेबाजीला समर्थन मिळण्याऐवजी ते स्वत:च ट्रोल होऊन बसले. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी टीकात्मक प्रतिक्रीया दिल्या.


काय म्हटले आहे थरूर यांनी?


थरूर यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आमच्या चलनाला डिमोनिटाइज करण्याची चूक केली. मोदी सरकारला समजायला हवे होते की, इंडियन कॅश जगाला आघाडीवर आहे. पहा आमची चिल्लरही मिस वर्ल्ड बनली'. थरूर यांनी असे ट्विट केले खरे. पण, त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. 


भारताच्या शिरपेचात मानाचा तूरा


दरम्यान, हरियाणाच्या मानुषी छिल्लरने शनिवारी मिस वर्ल्ड 2017चा किताब पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला. चीनमधील सान्या या शहरातील एरीना येथे आयोजित समारंभात जगभरातील विवीध देशातील 108 सुंदऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्वांना पाठीमागे टाकत छिल्लरने हा बहूमान मिळवला. मानुषी छिल्लरे या आधी फेमिना मिस इंडिया 2017चाही किताब जिंकला आहे. विश्वसुंदरीचा किताब जिंकणारी मानुषी ही 6वी भारतीय महिला आहे.



भारतीय विश्वसुंदऱ्या


प्रियांका चोप्रा (2000), युक्ता मुखी (1999), डायना हेडन (1997), एश्वर्या राय (1994) , रीता फारिया (1966) यांनी विश्वसुंदरी म्हणून नाव कोरले आहे.