उपचाराला पैसे नसल्याने पतीचा मृत्यू, पत्नीनं उभारलं हॉस्पिटल
आजारपण काय असतं हे रुग्णांच्या नातेवाईकांना नीट माहित असतं. त्याही पेक्षा गरीबाच्या घरात आजार काय असतो, हे तर न विचारलेलंच बरं.
कोलकाता : आजारपण काय असतं हे रुग्णांच्या नातेवाईकांना नीट माहित असतं. त्याही पेक्षा गरीबाच्या घरात आजार काय असतो, हे तर न विचारलेलंच बरं. कोलकात्याच्या सुभाषीनी मिस्त्री या २३ वर्षांच्या होत्या, तेव्हा पैसे नसल्याने उपचारांअभावी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर सुभाषिनी यांनी आयुष्यात अनेक खस्ताखाल्या. आपल्या ४ मुलांना सांभाळत, भाजीपाला विकला. प्रसंगी मुलाला अनाथालयात टाकलं, पण गरीबांसाठी हॉस्पिटल उभारलं. भारत सरकारने त्यांना या कार्याबद्दल पद्मश्रीने गौरवलं आहे, त्या आता ७५ वर्षांच्या आहेत.
दुष्काळात ७ भावंडं गेली
सुभाषनी यांचा जन्म १९४३ साली बंगालमध्ये भीषण दुष्काळ असताना झाला होता. सुभाषिनी यांच्यासह १४ भाऊ बहिण होते, दुष्काळात ७ भावंडाचा मृत्यू झाला, यानंतर त्यांचं लवकरच लग्न झालं.
हॉस्पिटलसाठी आधी शेड उभारलं
सुभाषिनी यांच्या पतीचा उपचाराअभावी, त्या २३ वर्षांच्या असताना १९७१ मध्ये मृत्यू झाला. यानंतर गरीब सुभाषिनी यांच्यावर ४ मुलांची जबाबदारी आली. यानंतर त्यांनी हॉस्पिटल सुरू करण्याचं ठरवलं. जवळ-जवळ २० वर्ष यासाठी त्यांनी पैसे जमा केले, सुभाषिनी या आपल्या हंसपुकूर गावात परतल्या, तेव्हा १९९२ साली १० हजार रूपयात त्यांनी १ एकर जागा घेतली.
शहरातील डॉक्टरांना मोफत सेवेची विनंती
तेव्हा त्यांनी या शेतात एक शेड उभं केलं, यानंतर सुभाषिणी यांनी लाऊडस्पिकरने शहरात जाऊन डॉक्टरांना मदतीचं आवाहन केलं. शहरातील डॉक्टरांना मोफत सेवा देण्याची विनंती करत आहोत. पहिल्या दिवशी येथे २५२ लोकांवर उपचार झाले, आता हे हॉस्पिटल ९ हजार स्क्वेअर फूटचं झालं आहे.
माझ्या मनाला शांती तेव्हा मिळेल...
सुभाषिनी यांना आता २४ तास रूग्ण सेवा द्यायची आहे. येथे गरिबांना मोफत उपचार मिळण्यास सुरूवात झाली आहे. दारिद्य रेषेत नसलेल्या लोकांकडून त्या फक्त १० रूपये उपचार फी घेतात. मात्र अजूनही सुभाषिनी म्हणतात, ज्या दिवशी या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध होईल, त्या दिवशी माझ्या मनाला शांती मिळेल.