सावधान! अवकाळी नव्हे आता चक्रीवादळाची भीती; पाहा कोणत्या भागाला असेल धोका
Latest News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काहीसा कमी होऊन देशातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पण, आता आणखी एक संकट घोंगावतानाही दिसत आहे.
Latest Weather News : ऐन दिवाळीमध्ये पावसाची सुरुवात झाली आणि अवकाळी यंदाही थैमान घालतो की काय अशीच भीती अनेकांच्या मनात असतानाच या अवकाळीचं सावट टळलं. पण, संकटं काही संपली नाहीत. कारण, एक संकट शमलं आणि हवामान विभागानं आता नवा इशारा दिला. हा इशारा आहे चक्रिवादळाचा.
हवामान वृत्तानुसार सध्या बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमुळं निर्माण होणाऱ्या प्रभावामुळं कमी दाबाचं क्षेत्रही तयार होऊ शकतं. प्राथमिक स्वरुपात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसांत चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : आज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल
प्रादेशिक विशेष हवामानशास्त्रीय केंद्र, दिल्ली (आरएसएमसी) यांच्या वतीनं चक्रिवादळासंदर्भातील ही माहिती देण्यात आली. मान्सूननं परतीची वाट धरल्यानंतर चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसते. यंदाचं वर्षही त्यासाठी अपवाद ठरलं नाही. किंबहुना याच धर्तीवर सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थिची रुपांतर चक्रिवादळात होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील वर्षीसुद्धा ऑक्टोबरदरम्यानच बंगालच्या उपसागरात सितरंग नावाचं चक्रीवादळ तयार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, सध्या निर्माण होणारे चक्राकार वारे नेमकी किती तीव्रता धारण करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार सध्या निर्माण होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची तीव्रता येत्या काळात नेमकी किती असेल यावरूनच चक्रीवादळाचं स्वरुप निर्धारित करता येणार आहे. राहिला प्रश्न हे वादळ नेमकं कुठं घोंगावतंय यासंबंधीचा, तर बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला हे चक्राकार वारे वाहत असून, पुढच्या 24 तासांमध्ये या वाऱ्यांचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे.
हे वारे पुढे वायव्य दिशेने जाणार असून, 16 नोव्हेंबरच्या सुमारास त्यांची तीव्रता वाढून दाब क्षेत्रात रुपांतरित होऊ शकतात. परिणामी येत्या चार दिवसांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊन त्याचे परिणाम देशभरात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.